चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य

निवडणुकांतील यशाचे गमक आणि जनमानसात उंचावणारे स्थान

चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य

चेतन भगत. या नावाला खरेतर ‘ओळख’ करून देण्याची गरजच नाही. तरीही, कदाचित कुणाला जर तशी गरज वाटत असेल, तर थोडक्यात ओळख – एक उच्चशिक्षित (आय आय टी दिल्ली, आय आय एम अहमदाबाद) प्रथितयश लेखक, कादंबरीकार (काही कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट बॉलीवूड मध्ये अफाट यशस्वी), उत्कृष्ट वक्ता, दर्जेदार मोठ्या वृत्तपत्र, नियतकालिकांचे स्तंभलेखक, मोटीवेशनल स्पीकर वगैरे.

अनेक पुस्तके प्रसिद्ध झाल्यापासूनच बेस्ट सेलर्स. आणि मुख्य म्हणजे, कुठल्याही राजकीय पक्ष / विचारधारेशी संलग्न नाही. असो. तर चेतन भगत यांनी अगदी अलीकडेच, गुजरात, हिमाचल राज्यांच्या निवडणूक निकालाच्या अनुषंगाने टाईम्स ऑफ इंडिया दैनिकासाठी वरील शीर्षकाचा लेख लिहिला आहे. ह्या लेखाचा उद्देश, सामान्य मराठी वाचकांना चेतन भगत यांचे विचार कळावेत इतकाच आहे. इथून पुढचा मजकूर स्वतः चेतन भगत यांच्या लेखावरच संपूर्णतः आधारित आहे.

पार्श्वभूमी : केंद्रात भाजप सरकार गेली आठ वर्षे सत्तेत आहे. अलीकडेच गुजरात निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. हिमाचलमध्ये जरी भाजपला अपयश आले असले, तरी देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने गुजरातचा विजय, हा निश्चितच जास्त महत्त्वाचा ठरतो. कारण गुजरातमधून २६ खासदार लोकसभेवर निवडून जातात, तर हिमाचल मधून केवळ चार. शिवाय, दोन्हीकडच्या मताधिक्यातील तफावतही लक्षणीय आहे. गुजरातेत भाजपची मतांची टक्केवारी ५२% आणि कॉंग्रेसची २७%. तर हिमाचलमध्ये भाजपचा पराभव केवळ १% च्या फरकाने झाला आहे.

जागतिक पातळीवर जर बघितले, तर आज मोठी लोकसंख्या असलेल्या कुठल्याही लोकशाही देशात, कुठल्याही राजकीय पक्षाला भाजप इतकी लोकप्रियता आणि निवडणुकांतील सातत्यपूर्ण यश मिळालेले नाही. भाजप सगळ्याच निवडणुका जिंकते, असे नक्कीच नाही. देशात लोकशाही जिवंत आहे आणि त्यामुळे भाजपला प्रत्येक विजयासाठी ठोस काम करावेच लागते.

भाजप काम करते आणि त्यामुळे जिंकतेही. अशा तऱ्हेने सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात, आणि आपण लगेच त्यावर टीका करतो, त्यातील धोके दाखवून देतो. भाजप सरकारवर (केंद्र आणि राज्ये, दोन्हींवर) टीकाही भरपूर होते, जी कदाचित अगदी वाजवी सुद्धा असेल. पण त्याबरोबरच आपल्याला हे कबूल करावेच लागेल, की भाजप काही गोष्टी अत्यंत योग्य तऱ्हेने करत आहे. भाजपच्या चुकांवरील टीकेच्या गदारोळात आपण हे विचारायला विसरू नये, की – “भाजप ‘योग्य’ / ‘बरोबर’ असे नेमके काय करते ?”

हे ही वाचा:

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य

९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश

मोदी सरकारमुळे ईशान्य भारतात दहशतवाद्यांनी टेकले गुडघे

पदयात्रेच्या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी जाणार का सुट्टीवर?

 

भाजप ज्या अत्यंत ‘योग्य’ / ‘बरोबर’ करते, अशा सहा गोष्टी : ज्यांपासून आपणही काही शिकू शकतो :

१. खरा मनःपूर्वक ध्यास (Passion) : असे म्हटले जाते, की एखादी गोष्ट आपण जेव्हा अगदी पूर्ण ध्यास घेऊन करतो, तेव्हा सुपरिणाम स्पष्ट दिसून येतात. हे भाजपच्या बाबतीत खरे आहे. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला निवडणुकांतील विजय आणि शासनाची संधी याबाबत जसा, जितका ‘ध्यास’ दिसतो, तसा क्वचितच कुठे इतरत्र बघायला मिळेल. आणि त्यातही विशेष म्हणजे तो ध्यास इतकी वर्षे, इतक्या निवडणुकांतील सततच्या यशानंतरही तसाच राहणे. खरेतर, काही काळाने असा ध्यास टिकून राहणे कठीण असते, आणि पक्ष संघटना सुस्त, आळशी बनते. भाजपचे असे झालेले नाही. यातून शिकायचे काय ? – आयुष्यात कधीही अल्पसंतुष्ट होऊन स्वतःच्या सुरक्षित आरामदायी कोशात (Comfort zone) गुरफटून घेऊ नका.

२. अथक परिश्रम : प्रत्येक निवडणुकीसाठी अजूनही शेकडो मेळावे आयोजित केले जातात, मग हवामान कितीही त्रासदायक असो, किंवा तो भूभाग कितीही दुर्गम असो. तुम्ही पक्षात जितके वरिष्ठ असाल, तितकी तुमच्याकडून कामाची अपेक्षा अधिक असते. (वरिष्ठांना कामाच्या बाबतीत कोणतीही सवलत नाही.) पक्ष संघटनेची यंत्रणा रोजच्या रोज, चोवीस तास, ३६५ दिवस अखंडपणे कार्यरत असते. यातून शिकायचे काय ? – आयुष्यात अथक परिश्रमांना पर्याय नाही; मग तुम्ही कितीही हुशार, बुद्धिमान असा, किंवा तुम्हाला आधीच कितीही यश मिळालेले असो.

३. सरळ सोपे संदेश – चोख अंमलबजावणी : स्वच्छ भारत (शौचालये), उज्ज्वला (एल पी जी सिलिंडर्स) हर घर जल (प्रत्येक घरात नळाचे पिण्याचे पाणी) – ही अशा साध्या सरळ संदेशांची काही उदाहरणे. पण सामान्य माणसाच्या जीवनात केव्हढा लक्षणीय फरक ! एखाद्याला ह्या गोष्टी जेव्हा आयुष्यात प्रथमच मिळाल्या असतील, तेव्हा त्याला त्याविषयी काय वाटत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. पण नुसत्या घोषणा करणे सोपे असते. त्यांची अत्यंत काटेकोर, चोख अंमलबजावणी करणे कठीण असते. ह्या आणि अशा योजनांचे लक्षावधी लाभार्थी जेव्हा प्रत्यक्ष असतात, तेव्हाच सरकार आणि पंतप्रधान यांचे ‘चाहते’ तयार होतात. यातून शिकायचे काय ? – आयुष्यात साधी स्पष्ट ध्येये ठेवा, पण त्यांची अंमलबजावणी नीट करा.

४. भारतीयांची मानसिकता अचूक ओळखणे : भाजप मतदारांचा अग्रक्रमाने विचार करते. एखाद्या सामान्य भारतीयाची मानसिकता भाजप एखाद्या ब्रांड च्या मार्केटिंग एजंट किंवा एखाद्या माध्यम समूहापेक्षा चांगल्या तऱ्हेने ओळखते. राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न असो, वा हिंदू संस्कृतीच्या जतन, संवर्धनाचा; इथल्या भाषा, घरगुती उत्पादने – यांबद्दलचे प्रेम असो, भाजपला सामान्य भारतीय कसा ‘विचार’ करतो, हे कळते, इतकेच नव्हे तर त्याला काय ‘जाणवते’, तेही कळते. आणि ह्यामध्ये विशेष हे आहे, की इतकी वर्षे सत्तेत राहूनही, भाजप आजही भारतीय सामान्य माणसाची ‘नाडी’ अचूक ओळखते. त्यासाठी तळागाळातले कार्यकर्ते लागतात, ज्यांची नाळ अजूनही सामान्य लोकांशी जोडलेली असते, राहते. दुसरा कुठलाही पक्ष ह्याबाबतीत भाजपच्या जवळपासही येऊ शकलेला नाही. यातून शिकायचे काय ? – तुमचा श्रोतृवर्ग, ग्राहक, (किंवा याठिकाणी मतदार) यांना नीट ओळखा. त्यामुळे तुमचा खूप फायदा होईल.

५. इंग्रजाळलेले बुद्धीजीवी / ‘साहेब’ लोकांच्या कौतुकाची अपेक्षा ठेवू नका : आपल्याकडील वसाहतवादी साम्राज्यसत्तेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे आम्हा भारतीयांना नेहमीच इंग्रजी साहेबाकडून कौतुक होण्याचे मोठे आकर्षण वाटत आले आहे. एखाद्याने आपले इंग्रजीत कौतुक केले, की आपण कोणी आपले मराठीत किंवा हिंदीत कौतुक केल्यावर जेव्हढे खुश होऊ, त्यापेक्षा कितीतरी अधिक खुश होतो. इंग्रजाळलेले पत्रकार / बुद्धीजीवी यांची भाजपला सुरवातीपासूनच फारशी ओढ राहिलेली नाही. जागतिक पातळीवरील एखादी मोठी संघटना, एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचा मुख्याधिकारी (CEO), जागतिक स्तरावरील माध्यमप्रमुख, यांनी केलेल्या कौतुकाबद्दल क्वचित कधीतरी भाजप कडून बोलले जात असेल, पण तशा तऱ्हेचे कौतुक मिळावे, यासाठी आपणहून प्रयत्न भाजप कधीही करत नाही. अर्थातच असे इंग्रजाळलेले पत्रकार / बुद्धीजीवी भाजपवर टीकेची झोड उठवीत असतात. मात्र अशावेळी भाजप आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून, केवळ जे खरे महत्त्वाचे, तेव्हढेच करत राहते – मतदारांचा विश्वास संपादन करणे, आणि त्यांची मते मिळवणे. यातून शिकायचे काय ? – आयुष्यात तथाकथित उच्चविद्याविभूषित, बुद्धिजीवी लोकांच्या कौतुकाची, त्यांच्या मान्यतेची आस बाळगू नका. आपल्या आजूबाजूचे सर्वसामान्य लोकच खरे महत्त्वाचे; त्यांच्यासाठीच काम करा.

६. आपल्या भारत देशासाठी महान स्वप्ने बाळगा, जोपासा : जेव्हा एखादा नेता, किंवा पक्ष देशासाठी उदात्त स्वप्ने पाहतो, बाळगतो आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झटतो, तेव्हा ते लोकांना निश्चितच भावते. मग अशी स्वप्ने कोणाला आत्ता, ह्या क्षणी कितीही अशक्यप्राय का वाटेनात. देशाला जगातील एक महासत्ता बनवणे, त्याला जगातील एक मोठी अर्थव्यवस्था बनवणे, आणि एक वैभवसंपन्न भारत बनवणे – अशी ध्येये बाळगणारे सरकार लोकांना निश्चितच आवडते. यातून शिकायचे काय ? – आयुष्यात काय, किंवा देशाच्या बाबतीत काय, स्पष्ट ध्येय बाळगणे, हे ध्येय नसण्यापेक्षा निश्चितच चांगले आहे. मग ते ध्येय प्रत्यक्षात आणणे सध्या कितीही कठीण का वाटेना.

भाजप सातत्याने निवडणुका जिंकत आहे, हा योगायोग नक्कीच नाही. आणि हे विजय कुठल्या एका विशिष्ट विचारधारेमुळे होत आहेत असे समजणे – हेही अतिसुलभीकरण (Oversimplification) होईल. भारतासारख्या अवाढव्य देशात गुजरातपासून त्रिपुरा पर्यंत असा जनाधार मिळवणे हे सोपे काम नाही. रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवाल्यापासून प्राध्यापका पर्यंत, उद्योगपती पर्यंत, तरुण कॉलेज विद्यार्थ्यापासून वरिष्ठ नागरिकापर्यंत – हा एव्हढा व्यापक जनाधार मिळवण्यासाठी, आणि तो टिकवण्यासाठी भाजप प्रचंड मेहनत करत आहे, कष्ट करत आहे. सध्याच्या घडीला जागतिक पातळीवर तो एक अत्यंत यशस्वी राजकीय पक्ष आहे, याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.

-श्रीकांत पटवर्धन

Exit mobile version