चांद्रयान ३ मोहिमेचा अगदी शेवटचा टप्पा आता जवळ येऊन ठेपला आहे. काही तासात चांद्रयान ३ हे चंद्रभूमीवर उतरणार असून त्याकडे अवघ्या पृथ्वीचे डोळे लागून राहिले आहे. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता हे चांद्रयान लँडिंग करेल असा विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या ऐतिहासिक घटनेकडे लागून राहिले आहे.
दरम्यान, रोज इस्रोच्या माध्यमातून चंद्राचे फोटो शेअर केले जात असून वेगवेगळ्या कोनातून चंद्राच्या विविध छटा दाखविल्या जात आहेत. इस्रोच्या माध्यम्यातून हे लँडिग १०० टक्के यशस्वी होण्यासाठी सगळ्या प्रकारची तांत्रिक काळजी घेण्यात येत आहे. या लँडिंगचे थेट प्रक्षेपण ५.२० रोजी सुरू करण्यात येणार आहे. इस्रोने X या हँडलवर ही माहिती दिली आहे.
१९ ऑगस्टला चांद्रयानातील लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेराच्या माध्यमातून काढण्यात आलेली छायाचित्रे इस्रोने शेअर केली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून हे लँडिग कुठे, कसे करता येईल, ते अधिक सुकर कसे होईल, याचा अंदाज घेतला जात आहे. त्याचवेळी या लँडिंगसाठी तेथील परिस्थिती अनुकूल नसेल तर २७ ऑगस्टला हे लँडिग केले जाऊ शकेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र ही शक्यता लक्षात घेताही २३ ऑगस्टलाच हे लँडिग होईल अशी खात्रीही दिली जात आहे. अहमदाबाद येथील इस्रोच्या केंद्राचे संचालक निलेश देसाई यांनी ही माहिती दिली.
देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान २३ ऑगस्टला ज्यावेळी लँड होणार असेल त्याआधी दोन तास आम्ही तेथील परिस्थिती लँडिंगसाठी अनुकूल आहे की नाही, याचा अंदाज घेऊ. जर त्यादृष्टीने काही अनुकूल नाही अशी शंका आली तर २७ ऑगस्टला आम्ही लँडिंग करण्याचा निर्णय घेऊ. अर्थात, अशी समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे २३ ऑगस्टलाच हे लँडिग होईल.
हे ही वाचा:
सेवा नाहीत; मग कामगार रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशाला?
विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले
आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज
दक्षिण ध्रुवावर का होते आहे लँडिंग
इस्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी सांगितले की, इस्रोच्या प्रत्येक मोहिमेत काहीतरी नवे करण्याचा विचार असतो. चंद्रावर पाण्याचा ठावठिकाणा शोधणे हे आमचे उद्दीष्ट आहे. चंद्रावर नेहमी धूमकेतू, लघुग्रह यांचे भाग आदळत अशतात. त्यामुळे तिथे सातत्याने मोठे खड्डे तयार होतात. शिवाय, त्यात बर्फ आणि पाण्याचे कण जमा असतात. या बर्फात पाणी असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कायम अंधार आहे तर तिथे असलेल्या उंच टेकड्यांमुळे तिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. त्यामुळे तिथे मानवाची वस्ती उभी करता येईल का, याचा विचार सुरू आहे. चंद्रावर अनेक मौल्यवान खनिजेही आहेत. त्यात हिलियम ३ या खनिजाचा समावेश आहे, ज्यामुळे प्रदूषणमुक्त वीज निर्माण करण्यात मदत होऊ शकते.
उत्तर प्रदेशातील शाळांत थेट प्रक्षेपण
दरम्यान, उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये या चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शाळा संध्याकाळी ५.१५ ते ६.१५ या वेळेत उघड्या ठेवण्यात येतील.
अनेकांनी चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी प्रार्थना केल्या आहेत. विविध वर्गातील लोक चांद्रयान मोहिमेकडे डोळे लावून बसले आहेत. सोशल मीडियावर यशस्वी लँडिंगसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कलाकार वर्गानेही चांद्रयान मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग थेट बघणार असल्याचे म्हटले आहे.
रशियाकडून शुभेच्छा
दरम्यान रशियाचे दक्षिण भारतातील राजदूत ओलेग निकोलायेविच अवदीव यांनी भारताच्या या चांद्रमोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपणही या लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चांद्रयान ३ ला नक्की यश मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रशियाचे लुना २५ हे चांद्रयान चंद्रावर उतरण्यापूर्वी कोसळले होते. त्यामुळे भारताच्या या प्रयत्नांकडे आता सगळ्या जगाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
- चांद्रयान ३ मोहिमेचा २३ ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस
- संध्याकाळी चांद्रयान चंद्रभूमीवर उतरणार
- संध्याकाळी ६.०४ वाजता लँडिंग
- इस्रोकडून संध्या. ५.२० पासून थेट प्रक्षेपण
- चांद्रयान जिथे उतरणार तिथे पुढील १४-१५ दिवस उजेड
- त्या सूर्यप्रकाशाच्या आधारे चांद्रयानाचे काम चालणार