जगातील सगळ्यात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयपीएलचा अंतिम सामना आज खेळला जात आहे. गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स असे दोन संघ आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत.
संध्याकाळी ८ वाजता हा सामना होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ २०२२ च्या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघ ठरले आहेत. साखळी सामन्यांपैकी गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकले आणि गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले. तर राजस्थानने १४ पैकी ९ सामने जिंकत दुसऱ्या स्थानावर हक्क सांगितला.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम
देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद
स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानने बंगलोर संघाला धूळ चारत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेमके कोण विजयी ठरणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गुजरात संघाकडे कर्णधार हार्दिक पांड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राशिद खान, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी अशा तगड्या खेळाडूंची फौज आहे. तर दुसरीकडे राजस्थानचा संघही कमजोर नाही. त्यांच्याकडे जॉस बटलर, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट अशा महारथींचा भरणा आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना अटीतटीचा होणार यात क्रिकेट रसिकांच्या मनात कोणतीही शंका नाही.