आयसीसी टी२० पुरूष विश्वचषक २०२१ चा अंतिम फेरीचा सामना आज रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी या अंतिम सामन्यात एकमेकांना भेटणार आहेत. जगभरातील क्रिकेट रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागले असून या वेळेचा टी२० विश्वविजेता कोण होणार हे अवघ्या काही तासातच ठरणार आहे.
दुबई-ओमान येथे सुरू असलेला आयसीसी टी-२० विश्वचषक बघता बघता अंतिम टप्प्यात आला आहे. आज म्हणजेच रविवार, १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ॲरोन फिंच याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ आणि केन विल्यमसन याच्या नेतृत्वातील न्युझीलंड संघ टी२० विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत. हे दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असून या सामन्यात चौकार षटकारांची आतिषबाजी, भेदक गोलंदाजी आणि तुफान क्षेत्ररक्षण क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल.
हे ही वाचा:
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर गुन्हा
टी-२० वर्ल्डकपचा नवा विजेता कोण?
‘हे मायावी बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर’
श्वानाची सजगता आणि पकडले गेले ९० कोटींचे ड्रग्स
ऑस्ट्रेलिया संघ सुपर १२ फेरीच्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता. तर ब गटातून न्यूझीलंडचा संघ वर आला आहे. या दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामनेही अतिशय चित्तथरारक झाले असून ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा पराभव केला. तर न्यूझीलंडने इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवला. या दोन्ही संघांचा आत्तापर्यंतचा प्रवास तसा सारखाच झाला आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे असे म्हणता येत नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होणार आहे. तर ७.३० वाजता खेळाला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. तर इंटरनेटच्या माध्यमातून हॉटस्टार वर देखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असेल.