यंदाची चॅम्पियन्स लीग ही इंग्लंडसाठी खास आहे कारण परत एकदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी ही इंग्लिश प्रिमिअर लीग मधील संघाकडेच जाणार आहे. २०१८-१९ च्या मोसमातही चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ हे इंग्लंडमधीलच होते. लिव्हरपूल विरुद्ध टोटेन्हम हॉट्सपर्स असा सामना होता आणि लिव्हरपूल हा विजेता संघ होता. या वेळच्या मोसमात चेल्सी विरुद्ध मँचेस्टर सिटी असा अंतिम सामना रंगणार आहे. चेल्सीने बलाढ्य अश्या रियल माद्रिदला हरवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रियल माद्रिदला चॅम्पियन्स लीग जिंकायची कशी याचा चांगलाच अनुभव आहे कारण या संघाने १३ वेळा ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे परंतु तरी चेल्सीने त्यांना नामोहरम करत इतिहासात जे घडले ते बदलता येतं याचीच प्रचिती करून दाखवली आहे. ३-१ गोल्सने चेल्सीने रियल माद्रिदला पराभूत केले. टिमो वेर्नर आणि मेसन माऊंट हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
हे ही वाचा:
शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा
पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करा
ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक
आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप
जानेवारी २०२१ पर्यंत चेल्सी संघ हा मोठ्या संघर्षातून जात होता परंतु थॉमस टुच्शेल यांची चेल्सीच्या मॅनेजरपदी नेमणूक झाली आणि चेल्सी अत्यंत आक्रमकरित्या खेळू लागली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. मागच्या वर्षी टुच्शेल हे पॅरिस सेंट जर्मेन या संघाचे मॅनेजर होते पण मागच्या वर्षी त्यांच्या संघाला बायर्न म्युनिक संघाकडून चॅम्पियन्स लीग मध्ये पराभव स्विकारावा लागला आणि नंतर त्यांची मॅनेजर म्हणून हकालपट्टी करण्यात आली पण यावर्षी चेल्सी संघाचे मॅनेजर म्हणून परत एकदा अंतिम फेरीत आपल्याला ते दिसणार आहेत.
या फेरीतील दुसरा संघ मँचेस्टर सिटी हा इंग्लिश प्रीमियर लीग जिंकणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे कारण ८० गुण कमवत हा संघ पहिल्या स्थानावर आहे. जर मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीगही जिंकली तर २०१२ च्या मोसमाची पुनरावृत्ती होईल कारण त्यावर्षी या संघाने या दोन्ही ट्रॉफीस् आपल्या नावावर केल्या होत्या. मँचेस्टर सिटी यंदा पॅरिस सेंट जर्मेन संघाला ४-१ गोल्सने हरवून अंतिम फेरीत दाखल झाली आहे. केविन डी ब्र्यून आणि रियाद महारेझ यांचा या विजयात मोठा वाटा होता.
दोन्ही संघांकडे खूप चांगले खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूची स्वतःची अशी शैली आहे आणि दोन्ही संघांचे मॅनेजर हे रणनीती आखण्यात अत्यंत हुशार आहेत त्यामुळे थॉमस टुच्शेल यांचा चेल्सी का पेप ग्वारडीओला यांचा मँचेस्टर सिटी संघ यांच्यापैकी कोण चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी आपल्या नावावर करतं हे बघण्यासाठी आपल्याला २९ मे ची वाट बघावी लागेल.