नेमकं खोटं कोण बोललं शरद पवार की ठाकरे?

शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेबाबत गौप्यस्फोट केला होता.

नेमकं खोटं कोण बोललं शरद पवार की ठाकरे?

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत असे, सांगून जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पत्ता कापला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची अजिबात लालसा नव्हती, परंतु नाईलाजाने पदावर विराजमान व्हावं लागलं. ही थिअरी ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनेकदा मांडली. तेच राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसतायत. त्यामुळे शरद पवार खोटं बोलले होते का? असा सवाल निर्माण झालेला आहे.

 

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचेचे नाव चर्चेत होते. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही, असे शरद पवारांनी सांगितले. त्यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले. त्यामुळे शिंदे यांचा पत्ता कापला गेला, ही कथा ठाकरे गटाकडून पेरण्यात आली.

 

दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पवारांच्या विधानात थोडी भर घातली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे विधान केले होते. या विधानावरून बराच वादंग झाल्यानंतर रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नव्हता, तो शब्द आपण घातला, अशी कबुली सावंत यांनी दिली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी झोड उठवली. ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही, असे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सांगितले होते, मग आता ते त्यांच्या हाताखाली काम करायला कसे काय तयार झाले? असा सवाल त्यांनी विचारला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा शिंदेंच्या नावाला आक्षेप होता, की ठाकरेंच्या सांगण्यावरून ही पुडी सोडण्यात आली होती? सगळा मामला नेमका कसा होता? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: बोलेले आहेत. ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसण्याची जबर इच्छा होती. त्यांनीच काही लोकांना शरद पवारांकडे पाठवून ‘मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव सुचवा’ असा निरोप पाठवला. ज्या लोकांनी हे केले त्यातले काही लोक सध्या माझ्यासोबत आहेत, काही विरोधी बाकावर बसलेले आहेत, परंतु वेळ आल्यावर मी याबाबतचा तपशील त्यांच्या नावासह उघड करेन’.

 

हे सांगणारे एकनाथ शिंदे पहिले नाहीत. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेबाबत गौप्यस्फोट केला होता. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. परंतु एक वर्षाच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले. त्यांनी माझ्यासह काही लोकांना बोलावले आणि शिवसेनाप्रमुखांकडे जाऊन माझे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवा, असे सांगितले. तेव्हा माझ्यासह काही आमदार शिवसेनाप्रमुखांना भेटायला गेलो होतो.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशात १० हजारांहून अधिक पर्यटक अडकले

उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत सापाची हजेरी!

१५ वर्षांत भारतातील ४१.५ कोटी जनता गरिबीतून पडली बाहेर

 

नवले हे त्यावेळी सरकारमध्ये मंत्री होते. ठाकरे मविआच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर नवले यांनी हा गौप्यस्फोट केला होता. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंच्या ज्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या ती इच्छा शरद पवारांनी मात्र पुरवली. त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे मी बाळासाहेबांना वचन दिले होते, अशा भाकड कथा सांगून उद्धव ठाकरे स्वत: शिवसैनिक बनले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

 

एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चाही झाली पाहिजे आणि त्यांचे नाव कापलेही गेले पाहिजे याची व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी करून ठेवली होती. शिंदेंचा पत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने कापला असे चित्र निर्माण करण्यात त्यांना यशही आले. १९९५ पासून मनातल्या मनात ज्या पदावर बसण्याचे मांडे उद्धव ठाकरे खात होते, ते स्वप्न २०१९ मध्ये पूर्ण झाले. ठाकरे स्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. परंतु तेव्हाही ते आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नव्हती, नाईलाजाने आपण पद स्वीकारले, असे बोलबच्चन द्यायचे. कधी बाळासाहेबांना वचन दिले आहे, असे सांगायचे तर कधी शरद पवारांनी सांगितले म्हणून आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झालो, असे कारण द्यायचे. उद्धव ठाकरेंना कधी झोकून देऊन काम करण्याची इच्छा नव्हती, परंतु मुख्यमंत्री पदाचा आनंद मात्र घ्यायचा होता. त्यामुळे मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि खाजवण्याइतकी शक्ती नसतानाही त्यांनी हे पद दुसऱ्याकडे सोपवले नाही. आज सत्ता गेल्यानंतर ते पुन्हा एकदा तीच टेप वाजवतायत की मला मुख्यमंत्रीपदाची लालसा नव्हती.

 

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता, हे ठाकरे गटाचे म्हणणे सत्य मानले तरी आता अजित पवार आणि त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार कसे झाले, हे समजणे फार कठीण नाही. ठाकरे माजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मीडिया बाईट देत असताना पाठी मागून डोळा मारणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकांनी पाहिलेले आहे. त्यांनी डोळा का मारला ते ठाकरेंना समजले असेल नसेल पण पाहणाऱ्यांना मात्र नक्कीच कळले. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात काम केले. तब्बल अडीच वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पाहिला. एकदा त्यांना पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांना उजवे वाटू लागले असतील अशी दाट शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version