आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?

निधीमुळे पाकिस्तानला मोठा आधार मिळू शकतो

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला ७० कोटी डॉलरची मदत?

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागली आहे. दिवाळखोरीत निघालेल्या या देशाच्या गंगाजळीला निधीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला ७० कोटी डॉलर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक परिस्थिती डबघाईला पोहोचल्याने पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. भाज्यांसह पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढल्या आहेत. या बिकट परिस्थितीत पाकिस्तानला केवळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आशा आहे. पाकिस्तानला निधी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाची बैठक ११ जानेवारी रोजी होत आहे. काही वृत्तांनुसार, पाकिस्तानला याच महिन्यात ७० कोटी डॉलर मिळण्याची आशा आहे. या निधीमुळे पाकिस्तानला मोठा आधार मिळू शकणार आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गौतम अदानी यांच्या मुलावर मोठी जबाबदारी!

जगभरातील २०० हून अधिक मंदिरांचे डिझाईन करणाऱ्या हातांनी साकारली राम मंदिराची डिझाईन

रामायणाचा संदर्भ देऊन उलगडले भारताच्या उत्थानाचे सार!

जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळयाप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

पाकिस्तानला मंजुरीची प्रतीक्षा
डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाने पाकिस्तानला जाहीर केलेल्या तीन अब्ज डॉलरच्या बेलआऊट फंडमधून ७० कोटी मिळण्याची आशा आहे. मंडळाच्या बैठकीनंतर पाकिस्तानला हा निधी मिळू शकतो. अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळ अंतिम मंजुरी देण्यास सकारात्मक आहे. या संदर्भातील बैठक ८, १० आणि ११ जानेवारी रोजी होईल. पाकिस्तानसाठी तीन अब्ज डॉलरच्या बेलआऊट फंड (आर्थिक मदत)पैकी १.८ अब्ज डॉलरची रक्कम शिल्लक आहे.

जुलैमध्येही मिळाली होती आर्थिक मदत
पाकिस्तानला याआधीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक मदत जाहीर केली होती. तीन अब्ज डॉलरपैकी १.२ अब्ज डॉलर गेल्या वर्षी जुलैमध्ये देण्यात आले होते. त्याचबरोबरीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही अटी-शर्तीही ठेवल्या होत्या. ज्या पूर्ण करण्यासाठी वीज आणि अन्य वस्तूंवर कर लादण्यात आले होते. तसेच, आर्थिक निधी वितरित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्मचारी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये एक करारही नोव्हेंबर २०२३मध्ये झाला होता. त्या करारानुसार, ही आर्थिक मदत या महिन्यात वितरित केली जाऊ शकते.

श्रीलंकेलाही केली होती मदत
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याआधी श्रीलंकेलाही कर्ज दिले होते, जेणेकरून श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था समस्याग्रस्त देशांना मदत करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे पाकिस्तानला मित्र देशांसह अन्य बहुपक्षीय कर्जदातांकडूनही निधी मिळाला होता.

Exit mobile version