रविवारी २६ डिसेंबर रोजी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. विशाल निकम हा स्पर्धक या पर्वाचा विजेता ठरला. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा, जय दुधाणे या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. यांच्यामधून विजेता कोण होणार याच्या चर्चा सुरू होत्या अखेर १०० दिवसांच्या या प्रवासानंतर विशाल निकम याने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम हा या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा आवडता बनला होता. घरातील विशालचा वावर, खेळातील उत्साही सहभाग यामुळे तो घराघरात पोहचला होता.
कोण आहे विशाल निकम?
विशाल निकमचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवखिंडी येथे शेतकरी कुटुंबात झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीसुद्धा आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात २०१८ मध्ये ‘मिथुन’ या सिनेमातून केली. या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर विशालने ‘धुमस’ या मराठी सिनेमातही काम केले. त्यानंतर विशालने ‘द स्नायपर’ या लघु पटात काम केले. परंतु, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ या टीव्ही मालिकांमुळे विशाल घराघरात पोहचला. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातातील सहभागानंतर विशालचा चाहतावर्ग आणखी वाढला आहे.
हे ही वाचा:
सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा
जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी
सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल
राज्यपाल घेणार विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय
१०० दिवासांपूर्वी हा बिग बॉस मराठीचा प्रवास १५ सदस्यांसोबत सुरू झाला होता. खेळाची रंगत वाढत असताना दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. या खेळाची चर्चा घराघरात होत असतानाच रविवारी ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा, जय दुधाणे या टॉप पाच मधून कोणता सदस्य ठरणार ‘बिग बॉस मराठी सिझन ३’चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर विशाल निकम या पर्वाचा विजेता ठरला; त्याला २० लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे.