राजीनामा मागणाऱ्यांनो रेल्वेमंत्र्यांची योग्यता तर पाहा!

अश्विनी वैष्णव आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी झटत आहेत. त्यांना राजीनामा द्यायला लावल्यामुळे परिस्थितीत काही फरक पडेल असे अजिबात नाही.

राजीनामा मागणाऱ्यांनो रेल्वेमंत्र्यांची योग्यता तर पाहा!

ओदिशात रेल्वेच्या झालेल्या अपघातानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची माहिती करून घेतली होती, काही आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे तिथे ३८ ते ४० तास ठाण मांडून आहेत. तेथे कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये, पुन्हा एकदा स्थिती पूर्ववत व्हावी यादृष्टीने ते लक्ष ठेवून आहेत. अशातच विरोधकांनी राजकारण करण्यास सुरुवात करताना वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे.

प्रियांका गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुळात अशी मागणी करण्यासाठी फारशी अक्कल असण्याची गरज नसते. पण वास्तववादी विचार केला तर राजीनामा देऊन हाती काही लागणारही नाही. अश्विनी वैष्णव आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळविता येईल यासाठी झटत आहेत. त्यांना राजीनामा द्यायला लावल्यामुळे परिस्थितीत काही फरक पडेल असे अजिबात नाही. तिथे दुसरा मंत्री आल्यानंतर तो आणखी चांगले काम करेल किंवा भविष्यात रेल्वेच्या कारभारात कोणतीही चूक होणार नाही, याचीही कोणती हमी नाही. तेव्हा वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ एक राजकारणाचा भाग असू शकते. पण ज्यांनी हा राजीनामा मागितला आहे, त्यांनी वैष्णव यांची पार्श्वभूमी जाणून घेणे मात्र अगत्याचे आहे.

कारण एरवी राजकीय नेते कसे शिकले सवरलेले असावेत अशी टोमणेबाजी विरोधक करत असतात. त्यांचा अर्थातच रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असतो. पण आज हेच सगळे शिकले सवरलेले विरोधक अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्यावर अडून बसले आहेत. अश्विनी वैष्णव यांची कारकीर्द पाहिली तर त्यातून हेच लक्षात येईल की, राजीनाम्याची मागणी करणारे हे त्यांच्यापेक्षा निश्चितच त्या योग्यतेचे नाहीत.

अश्विनी वैष्णव यांचे बालपण राजस्थानात गेले. त्यांनी इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले ते इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन या विषयात. तिथे त्यांनी सुवर्णपदक जिंकले. नंतर ते आयएएसच्या तयारीला लागले. १९९४मध्ये ते आयएएस उत्तीर्ण झाले तेही देशात २७व्या क्रमांकाने. मग त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते अमेरिकेत गेले. तिथून परतल्यावर त्यांनी इथे अनेक खासगी नोकऱ्या केल्या. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ हुद्द्यांवर त्यांनी काम केले. सीमेन्ससारख्या आघाडीच्या कंपनीत ते उपाध्यक्ष होते. आयएएसमध्ये ते ओदिशा कॅडरचे अधिकारी राहिले आहेत. त्यामुळे बालासोर, कटक याठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना काम करता आले. २००३पर्यंत त्यांनी हे काम केले. नंतर तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. पंतप्रधान कार्यालयाचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आज ते ओदिशाचे राज्यसभा खासदार आहेत.

हा त्यांचा प्रवास पाहिला की लक्षात येते की, आज ज्याठिकाणी हा अपघात झाला ते ओदिशा राज्य आणि तिथला बालासोर जिल्हा याठिकाणी काम करण्याचा दीर्घ अनुभव वैष्णव यांच्या गाठीशी आहे. तिथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले असल्यामुळे तिथले प्रशासन त्यांना चांगले ठाऊक आहे. शिवाय, बुद्धिमान व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी घेतलेल्या शिक्षणावरून येतेच. मग अशा व्यक्तीवर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वास ठेवत असतील तर त्यात गैर काय?

हे ही वाचा:

मुंबई क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद, अयान पठाण सर्वोत्तम खेळाडू

आपल्या मुलीला ‘हिरोईन’ बनवण्यासाठी आई तिला देत असे ‘हार्मोन्सच्या गोळ्या’ !

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

जे आज राजीनामा मागत आहेत, त्यांची तरी शैक्षणिक योग्यता वैष्णव यांच्याएवढी आहे का? कारण हेच सगळे विरोधक शिकल्या सवरलेल्या पंतप्रधानाची मागणी करताना दिसतात. त्यांना जर खरोखरच शिकलेल्या नेत्याबद्दल आस्था आहे तर वैष्णव हे ती योग्यता बाळगून आहेत, तेव्हा त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा आधी त्यांची पार्श्वभूमी जाणून घ्या. त्यांच्याकडे असलेला तो प्रशासनिक अनुभवच त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो. मग अशा एका शिकल्यासवरलेल्या माणसाला पंतप्रधान एवढी मोठी जबाबदारी देतात तेव्हा त्याचेही स्वागत व्हायला पाहिजे. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या विरोधकांना वैष्णव यांची ही पार्श्वभूमी दिसणार नाही. वैष्णव आज जे ३८ तास तिथे ठाण मांडून आहेत त्यामागील कारण याठिकाणी त्यांनी केलेले काम, तिथला अनुभव हेच आहे. तेव्हा त्यांच्या कामावर आक्षेप घेण्यापूर्वी एकदा त्यांच्या कारकीर्दीचा विरोधकांनी अभ्यास केला तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल.

Exit mobile version