आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे असे एक लक्ष्य जगाने नुकतेच साध्य केले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी मलेरियाच्या लसीला मान्यता दिली आहे. जगातील ही मलेरिया वरची पहिलीच लस असणार आहे. RTS,S/AS01 असे या लसीचे नाव आहे.
डासाच्या डंखाने मलेरिया हा आजार होतो. जगभरात वर्षाकाठी लाखो नागरिक हे मलेरियाच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडतात. जगातील सुमारे चार लाख नागरिक प्रतिवर्षी मलेरियामुळे दगावतात. यात आफ्रिका खंडातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही आफ्रिकेतील लहान मुलांचा आकडा हा खूप जास्त आहे.
या लसीला मान्यता देण्या आधी एक विस्तृत पायलट प्रोग्रॅम चालविण्यात आला होता. २०१९ पासून हा कार्यक्रम सुरू होता. या अंतर्गत घाना, केनिया, मालवी या ठिकाणच्या नागरिकांना या लसीच्या वीस लाखापेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. जीएसके या औषध बनविणाऱ्या कंपनीने १९८७ साली पहिल्यांदा ही लस बनवून बाजारात आणली होती.
हे ही वाचा:
मुस्लिम शिक्षकांना वेगळे करून काश्मीरात हिंदू, शीख शिक्षकांची हत्या
या व्यतिरिक्त इतरही लसींवर काम करणे सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड मधील संशोधकांनी ‘मॅट्रिक्स एम’ लस बनवली होती. ही लस ७५ टक्के गुणकारक असल्याचे संशोधकांनी सांगितले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर मलेरिया विरोधातील लढ्याला बळकटी मिळणार आहे.