लोकसभेच्या महाभारताआधी आदित्य ठाकरे तपश्चर्येवर ?

एखाद्या सिद्धीच्या शोधात आदित्य ठाकरे बाहेर पडले असण्याची शक्यता

लोकसभेच्या महाभारताआधी आदित्य ठाकरे तपश्चर्येवर ?

लोकसभा निवडणुकीचा पारा चढायला लागलेला सर्वसामान्य जनता उबाठा गटाचे स्टार प्रचारक आदित्य यांचा आवाज ऐकायला तरसते आहेत. ज्युनिअर ठाकरे गायब झाले आहेत. ते कुठे दिसत नाहीत, त्यांचा बुलंद आवाजही गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जनतेच्या कानावर पडलेला नाही. अनेकजण त्यामुळे प्रचंड कासावीस झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेसाठी ते अचानक उगवले. पुन्हा गायब झाले. प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना आदित्य यांचा राहुल गांधी झालाय का, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.

विरोधकांमध्ये सुद्धा आदित्य यांच्या अनुपस्थितीबाबत कुजबुज सुरू आहे. लोकसभेचे महाभारत सुरू होण्याआधी भाजपाला पराभूत करणाऱ्या एखाद्या सिद्धीच्या शोधात आदित्य ठाकरे बाहेर पडले असण्याच्या शक्यतेने विरोधक भयकंपित झालेले आहेत.

शिवसेना फुटल्यापासून उबाठा गटाकडे फक्त तीन बुलंद आवाज उरलेले आहेत. स्वत: उद्धव ठाकरे, विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे. शिवसेना फुटल्यानंतर खोखे, खोके ओरडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत फिरणारे आदित्य ठाकरे राहुल यांच्या शिवतीर्थावरील रॅली आधी विदेशात होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्सवर तशी पोस्ट केली होती. आदू बाळ थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसलाय, अशी पोस्ट त्यांनी केली होती. शिवसेनेची उबाठा गटाच्या या स्टार प्रचारकावर किती बारीक नजर आहे, हे म्हात्रे यांच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ठाकरेंना मुंबईचा उन्हाळा सहन होत नाही. उन तापायला लागले की ठाकरे, त्यांचे कुटुंब आणि त्यांची जबाबदारी लंडनला रवाना होतात. महिना पंधरा दिवस थंड होतात आणि नंतर नव्या दमाने मुंबईत दाखल होतात. यंदाचा उन्हाळा जरा वेगळा आहे. उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे ठाणे, रायग़ड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव असे एका पाठोपाठ एक दौरे करतायत. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत केलेली नसेल इतके दौरे करतायत. झेपत नसताना मेहनत घेतायत. तापलेल्या उनात वणवण फिरतायत. लंडनच्या गार वाऱ्यांची, थंड गार वातावरणाची त्यांना आठवण सुद्धा येत नाही, इतके ते राजकारणात आकंठ बुडालेत. दौऱ्यांसोबत मित्र पक्षांसोबत गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. जागावाटपाचा तुकडा पाडण्यासाठी मोठा खल सुरू आहे. कधी नव्हे ती बापाकडून अशी ढोर मेहनत सुरू असताना चिरंजीव मात्र कुठल्या थंड हवेचा आस्वाद घेतायत कोण जाणे?

बाहेर कुठे तरी संपूर्ण शांततेची अनुभूती घेत भाजपाच्या विरोधात अमोघ अस्त्राचा शोध सुरू असताना राहुल गांधी यांच्या सभेसाठी त्यांना मनाविरुद्ध ब्रेक घ्यायला लागला असावा. मालकाच्या सभेला गेलो नाही, तर मालकाची खप्पा मर्जी होईल, नोकरी जाईल या भीतीने आदित्यच्या पप्पांनी त्याला तातडीने बोलावून घेतले असावे. आदित्य मनाविरुद्ध मुंबईत दाखल झाले. मालकाला मुखदर्शन देऊन पुन्हा गायब.

संसदेचे अधिवेशन असो, विधानसभेच्या वा लोकसभेच्या निवडणुका असो, अचानक बँकॉकला रवाना व्हायचे आणि तिथे जाऊन ध्यान धारणा करायची हे राहुल गांधी यांचे वैशिष्ट्य आहे. आरोग्य चूर्ण घ्यायचे आणि ध्यानात लीन होऊन जायचे. एकदा का ध्यानाची सुरसुरी आली की मग निवडणुका आणि अधिवेशनासारखे फालतू विषय त्यांना रोखू शकत नाही. ध्यानधारणेसाठी बँकॉकसारखे ठिकाण नाही. नेमकं हेच वैशिष्ट्य आदित्य यांनी उचललेले दिसते. अचानक गायब होऊन तेही ध्यान धारणेसाठी रवाना झाले असण्याची शक्यता आहे. विरोधक मात्र उगाचच गेला आदित्य कुणी कडे अशी खिल्ली उडवण्याचे काम करतायत.

महाभारताच्या युद्धाआधी अर्जुनाने दिव्यास्त्रांसाठी तपश्चर्या केली होती. भीमाशी गदायुद्ध करण्याआधी दुर्योधन तळ्याच्या पाण्यात एक विशाल बुडबुडा निर्माण करून त्यात ध्यानस्त बसलेला होता. राज्यात आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली असताना आदित्य ठाकरे सुद्धा भाजपाला चितपट करण्यासाठी असेच काही करायला गेले आहेत का?

हे ही वाचा:

हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के!

काँग्रेसला झटका; हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

ऋतुराज चेन्नई सुपरचा नवा किंग

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

आदित्य यांच्या अचानक गायब होण्यामुळे भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ आहे. शिवसेनेचे नेतेही चिंतित आहेत. उबाठा गटात मात्र सुशेगात आहे. आदित्य खास मोहीमेवर असणार याबाबत उबाठा गटातील कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. ते जिथे असतील तिथे भाजपाच्या पराभवासाठी कष्ट करीत असतील याची त्यांना खात्री आहे.

२०२४ नंतर आमचे सरकार येणार, आमचा पंतप्रधान होणार असे भाकीत आदित्य ठाकरे यांनी अनेकदा केलेले आहे. त्यांच्या गायब होण्याचा आणि त्यांच्या भाकीताचा निश्चितपणे संबंध आहे, याची उबाठा गटातील नेत्यांनाही खात्री आहे. भाजपाचा पराभव करणाऱ्या एखाद्या प्रगत तंत्रज्ञानाची ते अमेरीकेत चाचपणी करीत असण्याची शक्यता तर अजिबात नाकारता येत नाही. त्यांच्या गायब होण्याचे कारण उलगडावे, आदित्य नेमके कशात बिझी आहेत, याचे कारण समोर यावे यासाठी विरोधक निकराचा प्रयत्न करतायत. एक्सवर पोस्ट टाकून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आदित्य कोणाला ताकास तूर लागू देणार नाहीत, अशीच चिन्हे आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version