28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेष...ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?

…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?

ऐतिहासिक कामगिरी करूनही होते आहे का दुर्लक्ष?

Google News Follow

Related

भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर तमाम भारतीयांमध्ये एक उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. ते स्वाभाविकही होते. आपण २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर १७ वर्षांनी ही कामगिरी आपल्या संघाला करता आली. या संघाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचेही खूप कौतुक झाले. संपूर्ण भारतीय संघाला महाराष्ट्र राज्य सरकारने ११ कोटींचे इनाम जाहीर केले. तसेच मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी १ कोटींचे इनाम जाहीर करण्यात आले. शिवाय, त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मुंबईतल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. या सगळ्याबद्दल प्रत्येकालाच आनंद वाटत होता. भारतीय संघाने इतक्या वर्षांनी वर्ल्डकप जिंकला. त्यात मुंबईकर खेळाडूंचेही योगदान होते, ही महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी आनंदाची बाब होती.

पण त्याचवेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेच्या बाबतीत काय घडले? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलने ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझ जिंकले. या प्रकारात  कामगिरी करणारा तो देशातील पहिलाच खेळाडू ठरला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासाठी त्याने केलेली ही कामगिरी ऐतिहासिक अशीच आहे. ७२ वर्षांपूर्वी म्हणजे १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी ब्राँझपदक विजेती कामगिरी केली होती. हे भारताचे पहिले वैयक्तिक पदक ठरले होते. त्याआधी, भारताने हॉकीत सुवर्णपदके जिंकली होती पण वैयक्तिक पदक भारताला मिळाले नव्हते ते मिळविले महाराष्ट्राच्या एका खेळाडूने. एकप्रकारे तो इतिहासच रचला गेला. पण त्यानंतर भारताला वैयक्तिक पदक मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. लिएण्डर पेसने हे पदक भारताला जिंकून दिले ते १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये. पुढे हा सिलसिला सुरू राहिला पण महाराष्ट्रातल्या खेळाडूंना मात्र पदकविजेती कामगिरी करता आली नव्हती. ती कामगिरी स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या खेळाडूने करून दाखविली आहे. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वप्नीलने ही कामगिरी केल्यानंतर राज्य सरकारने त्याला १ कोटींचे इनाम जाहीर केले.

प्रश्न आहे की, ज्या पद्धतीने टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना रक्कम जाहीर केली गेली. त्यांचा सत्कारही झाला. तसा सत्कार स्वप्नीलच्या नशिबी नाहीए का? पॅरिस ऑलिम्पिक समाप्त होऊन आज बरेच दिवस लोटले. तरीही अजून त्या स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक होते आहे, तो आनंद अजूनही खेळाडू, चाहते अनुभवत आहेत मग आताच ही वेळ आहे की राज्य सरकारने स्वप्नीलला सन्मानित करायला हवे. पण अजूनही सरकारला त्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही.

क्रिकेट आणि ऑलिम्पिक खेळ यात फरक आहे. क्रिकेट हा तर सांघिक खेळ आहे. त्यात प्रत्येक खेळाडूचे योगदान किती असेल हे माहीत नसते पण वर्ल्डकप किंवा एखादी मोठी स्पर्धा जिंकली तर श्रेय सगळ्यांना सारखेच मिळते. वैयक्तिक खेळात जबाबदारी एकाच खेळाडूच्या खांद्यावर असते. थोडी जरी चूक झाली, गफलत झाली तर पदक हातातून निसटून जाऊ शकते. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी चार वर्षे केलेली मेहनत वाया जाते आणि पुन्हा प्रतीक्षा करावी लागते ती चार वर्षांची. मग अशावेळी खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक वेळीच केले गेले पाहिजे. नेमबाजी हा खेळ तर अधिक कठीण. एकाग्रतेवर अवलंबून. जरादेखील एकाग्रता भंग पावली तर हातातून पदक निसटून जाण्याची शक्यता. अशा परिस्थितीत स्वप्नीलने ही कामगिरी करून दाखविली आहे, त्याच्या कामगिरीचे मोल म्हणूनच मोठे आहे.

ब्राँझपदक म्हटल्यावर काहीजणांचे म्हणणे असते की, रौप्यपदक का नाही, सुवर्ण का नाही? खरे तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच मोठे दिव्य असते. तिन्ही पदकांत असलेला फरक हा फार मोठा नसतो. काही सेकंदांनी, काही गुणांनी पदक हुकते. त्यामुळे ब्राँझपदकाला कमी लेखून अजिबात चालणार नाही. अशी सगळी परिस्थिती असतानाही स्वप्नीलसारख्या खेळाडूला सन्मानापासून दूर का ठेवले आहे?

हे ही वाचा:

डॉक्टर बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपकडून उद्या बंगाल बंदची हाक !

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ

महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनकडे

एकीकडे हरयाणासारख्या राज्यात विनेश फोगाट ही अंतिम फेरीत खेळण्यास दुर्दैवाने अपात्र ठरली असतानाही तिला चार कोटी रुपये देण्यात आले. मग महाराष्ट्रात एक पदक जिंकून आलेल्या खेळाडूकडे असे दुर्लक्ष का? सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवून सरकार घरोघरी पोहोचत आहे मग स्वप्नीलसारख्या खेळाडूची भेट घेणे का अवघड बनले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या खेळाडूंची त्वरित भेट घेतली, ते प्रत्यक्ष फोनवरूनही या खेळाडूंशी संवाद साधत असतात, मग राज्य सरकारला नेमकी कोणती अडचण आहे असा प्रश्न मनात डोकावल्यावाचून राहात नाही. स्वप्नीलने राज्यातील क्रीडा प्रबोधिनीतूनच आपल्या वाटचालीस सुरुवात केलेली आहे. तिथून आज तो ऑलिम्पिक पदकापर्यंतची झेप घेऊ शकला आहे. याचा अभिमान बाळगायला नको का? खाशाबा जाधव यांनी ही कामगिरी करूनही त्यांच्या नशिबी सरकारचे पाठबळ नव्हते. इतक्या वर्षानंतरही त्यांची कदर झाली नाही. मग स्वप्नीलच्या वाट्याला क्रिकेटपटूंचे हे भाग्य कधी येणार असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरू नये.

स्वप्नीलच्या यशात त्याच्या आईवडिलांचे मोठे योगदान आहे, त्याच्या प्रशिक्षकांनीही खूप कष्ट उपसले आहेत. हा गौरव स्वप्नीलचा जसा असेल तसाच तो या सगळ्यांच्या कष्टाचा, त्यांनी केलेल्या त्यागाचाही असेल. सरकारने हा सन्मान लवकरात लवकर द्यावा अशी मागणी करणे हेच मुळात पटणारे नाही. सरकारकडूनच हे पाऊल स्वतःहून उचलले गेले तर त्याला खरे मोल आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा