मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ही घटना निश्चितच दुर्दैवी आणि संतापजनक होती. इतक्या कमी कालावधीत हा पुतळा का कोसळला हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्याची योग्य चौकशी व्हावी, त्यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी प्रत्येकाची मागणी आहे. मात्र राजकारण करणाऱ्यांना या कारवाईशी देणेघेणे नाही. तो त्यांच्या मागणीचा एक भाग असला तरी त्यांना करायचे आहे ते सत्तांतर. विशेषतः महाविकास आघाडीने या घटनेनंतर रविवारी महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलनाची हाक दिली होती. पण त्याआधीच पंतप्रधान पालघरला आले. तेथे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आणि आपण शिवरायांच्या चरणी नतमस्तक असल्याचे सांगितले. त्याशिवाय, त्यांनी सावरकरांचा अपमान जे करत आहेत, त्यांना कधी सवाल विचारणार असाही प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.
नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीनंतर विरोधकांचे समाधान झाले नाही. पण या माफीमुळे विरोधकांच्या जोडे मारो आंदोलनातील हवाच निघून गेली. रविवारी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला. अवघ्या तासा दीडतासाच्या या मोर्चानंतर महायुतीतील नेत्यांच्या फोटोना जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला. हे करताना आपण कसे खरे शिवप्रेमी आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा भाषण करताना टीका केली. या जोडे मारो आंदोलनाच्या निमित्ताने २००४ च्या घटनेची आठवण येते. २००४मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालिन काँग्रेस मंत्री मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. ते आंदोलन होते जोडे मारो आंदोलन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर यांनी केला होता. अंदमान येथील सेल्युलर जेलमधून सावरकरांची पाटी त्यांनी काढली होती. तेव्हा बाळासाहेबांनी दिसेल तिथे मणिशंकरचे जोड्याने थोबाड फोडा असे आदेश दिले होते. स्वतः बाळासाहेबांनी मणिशंकर यांच्या पुतळ्याला जोडे लगावले होते. तेव्हा बाळासाहेबांची सावरकरांबद्दलची भूमिका तेवढीच ठाम होती. ती कोणत्या राजकीय लाभासाठी बदलणारी नव्हती किंवा बोटचेपी नव्हती. दुर्दैवाने त्यांचे पुत्र उद्धव यांनी मात्र ही भूमिका बदलली.
काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान करण्यात आल्यानंतरही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाकडून कधीही त्याला जाब विचारला गेला नाही, त्याला कठोर विरोध केला गेला नाही. दोन वर्षांपूर्वी संजय राऊत यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणत होते की, बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर ही अशी व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांनी अवघ्या देशाला हिंदुत्व शिकवले. मग याच त्यांच्या वक्तव्याचा आज काय अर्थ आहे? शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून टीका करताना सावरकरांच्या अपमानावरही बोलले पाहिजे. मुळात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर जे आज बोलत आहेत, त्यात काँग्रेस, शरद पवार यांच्याकडून समोर येणारी वक्तव्ये पाहता आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही की, ज्यांनी कधीही शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून राजकारण केले नाही, त्यांना अचानक शिवाजी महाराजांची आठवण तरी का यावी?
काँग्रेसच्या कुठल्या कार्यक्रमात आपण शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा ऐकलेल्या नाहीत की त्यांचे फोटो बॅनरवर झळकलेले पाहिले नाहीत. अगदी शिवजयंतीही कधी काँग्रेसने साजरी केल्याची उदाहरणे दिसत नाहीत मग अचानक आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देतात, तेव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. खासदार वर्षा गायकवाड हातात शिवछत्रपतींची मूर्ती घेऊन आंदोलनात उतरलेल्या दिसतात. पण याआधी कधीही त्यांचे हे शिवप्रेम दिसलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तर शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारा पक्ष.पण त्यांनी आता टीका होऊ लागल्यावर त्यात शिव हा शब्द घुसवत शिव शाहू फुले आंबेडकर असे म्हणायला सुरुवात केली.
हे ही वाचा:
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?
बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !
पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !
सावरकरांबद्दल तर त्यांची भूमिका स्पष्टच आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सावरकरांना माफीवीर म्हणायला कमी करत नाहीत. मग अशा पक्षांशी आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सावरकरांचा अपमान होत असताना तो सहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पण हे पक्ष मोदींवर मात्र शिवछत्रपतींचा अपमान केला म्हणून टीकेची झोड उठवतात. तेव्हा विचार येतो की, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचे उद्घाटन झाले तो कोसळला हे दुर्दैवी आहे. पण तो पुतळा मोदींच्या हस्तेच तिथे उभारला गेला. त्याआधी, कोणत्याही पंतप्रधानाने सिंधुदुर्गात असा पुतळा उभारलेला नाही. किंबहुना, मोदींप्रमाणे कोणताही पंतप्रधान तळकोकणात सिंधुदुर्गात आलेलाही नाही. याच नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेच्या आकारातील चिन्ह विराजमान केले. पण ज्यांनी कधीही कोणते गडकिल्ले पाहिले नाही, तिथे ते गेले नाहीत, शिवरायांचा पुतळाही ज्यांनी बसवला नाही, त्यांनी शिवरायांच्या अपमान झाल्याचा आरोप करावा? शरद पवार तर त्यांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर गेले. तब्बल ४० वर्षानंतर रायगडावर आल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने तर कधीही शिवरायांच्या नावाचा उपयोगही केला नाही. पण त्यांना पंतप्रधान होण्याआधी आणि नंतर शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर गेलेल्या नरेंद्र मोदींचा राग यावा?
लोकांनीच आता हे ठरविले पाहिजे की खरे शिवभक्त कोण? जे आपल्या स्वार्थासाठी जोडे मारो आंदोलन करतात ते की जे आपल्या वाटचालीत प्रत्येकवेळेला शिवरायांचे नाव घेतात, त्यांना सन्मान देतात ते?