भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलंबो दौऱ्यादरम्यान श्रीलंकेच्या १९९६ च्या वर्ल्ड कप विजेता संघाच्या सदस्यांशी खास संवाद साधला. या बैठकीत श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, चमिंडा वास, अरविंद डी सिल्वा, मार्वन अटापट्टू, रविंद्र पुष्पकुमार, उपुल चंदना, कुमार धर्मसेना आणि रोमेश कालूवितराना सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदींनी भारताच्या १९८३ च्या आणि श्रीलंकेच्या १९९६ च्या वर्ल्ड कप विजयांचा जागतिक क्रिकेटवर झालेल्या बदलांमध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, श्रीलंकेच्या संघाने १९९६ मध्ये जो आक्रमक आणि नाविन्यपूर्ण खेळ दाखवला, त्याने टी२० क्रिकेटच्या जन्मास प्रेरणा दिली. त्यांनी त्या वेळचा भारताचा श्रीलंका दौरा आठवला, जेव्हा बॉम्बस्फोटानंतरही भारताने श्रीलंकेला साथ दिली होती. त्यांनी याला ‘खेळ भावना आणि टिकाऊ मैत्रीचं प्रतीक’ म्हटलं. २०१९ मध्ये श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या दौऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला आणि भारताची भावना नेहमीच ‘एकसारखी’ राहते असंही सांगितलं.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी पीएम मोदींना विनंती केली की, उत्तरी श्रीलंकेतील, विशेषतः जाफना भागात एक उच्च दर्जाचा क्रिकेट मैदान विकसित करण्यात भारताने मदत करावी. त्यांनी भारताकडून आर्थिक संकटाच्या वेळी मिळालेल्या उदार मदतीबद्दलही आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी ‘शेजारी प्रथम’ धोरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आणि म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर भारताने दिलेल्या मदतीचं उदाहरण दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की भारत आपल्या शेजारी देशांशी मजबूत आणि टिकाऊ संबंध ठेवण्यास नेहमीच वचनबद्ध आहे.
या भेटीनंतर श्रीलंकेच्या १९९६ विश्वचषक विजेता संघातील खेळाडूंनी पीएम मोदींशी झालेल्या भेटीला ‘सुखद’ अनुभव असल्याचं सांगितलं.
माजी श्रीलंकन क्रिकेटपटू मार्वन अटापट्टू म्हणाला, “ही एक विलक्षण भेट होती. आम्ही जगभर प्रवास केला आहे, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना भेटलो आहोत, पण एका राष्ट्रप्रमुख आणि ताकदीच्या नेत्याला भेटणं, ज्यांनी भारताला शिखरावर नेलं, हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आज संध्याकाळी पंतप्रधानांशी भेटणं हे सन्मान आणि सौभाग्य होतं.”
माजी यष्टीरक्षक रोमेश कालूवितराना म्हणाला, पीएम मोदी सत्तेत आल्यानंतर अनेक गोष्टी सुधारल्या आहेत. याचा फायदा श्रीलंकेलाही झाला आहे.
हे ही वाचा:
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
भारताने म्यानमारला मदत वाढवली, ३१ टन साहित्य घेवून विमान रवाना!
प्लिज…प्लिज… कामराची मुंबई पोलिसांना विनंती!
ममता बॅनर्जी यांच्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अग्निमित्रा पॉल काय म्हणाल्या…
माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास म्हणाला, १९९६ चा वर्ल्ड कप विजेता संघ म्हणून पंतप्रधान मोदींना वैयक्तिकरित्या भेटणं ही आमच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट होती. आम्ही त्या विजयावर आणि भारताविरुद्धच्या लढतीवर चर्चा केली, तसेच श्रीलंकेच्या क्रिकेटच्या भविष्यासंदर्भातही संवाद झाला.
१९९६ वर्ल्ड कपचा स्फोटक फलंदाज स्टार आणि डावखुरा आक्रमक सलामीवीर सनथ जयसूर्या म्हणाला, “१९९६ च्या संघासाठी पंतप्रधान मोदींना भेटणं हा एक उत्कृष्ट संधी होती. आम्ही काही मुद्द्यांवर चर्चा केली आणि आमच्या क्रिकेट अनुभवांची देवाणघेवाण केली. ही भेट आमच्यासाठी एक अतिशय छान अनुभव होता. पंतप्रधान मोदींनी भारतात केलेल्या कार्यांबद्दलही सविस्तर माहिती दिली.”