वाद आणि आव्हाड हे एक समीकरणच बनले आहे. आपल्याला इतिहासाचे सगळे ज्ञान आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न आव्हाड नियमितपणे करत असतात. विशेष करून त्यांना मुघली इतिहासाबद्दल अधिक आपुलकी आहे. मात्र हिंदू, ब्राह्मण, हिंदू देवीदेवता याबाबतीत त्यांच्या टिप्पण्या हेटाळणी करणाऱ्या असतात. परंतु त्याबद्दल त्यांनी कधी ना खेद व्यक्त केला ना कधी माफी मागितली. उलट आपण हे कसे सत्यच बोललो त्याचे दाखले देताना ते दिसतात. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला की त्यावर ज्ञानामृत पाजणे हा त्यांच्या आवडीचा विषय असतो. आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रकरणात चक्क माफी मागितली आहे. हो जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. पण यावेळी त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या टिप्पणीवरून लोटांगण घातले आहे. थेट मुस्लिम समाजाचीच त्यांनी माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबात काढलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्या मुस्लीम मतदारसंघातील मुस्लीम कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाची नाराजी होती. औरंगजेब क्रूर नव्हता हे विधान त्यांनी आधी केले होते, नंतर तो क्रूर असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला. त्यातून मुस्लिम समाजातील काही लोक त्यांच्यावर नाराज झाल्याचे समोर आले होते. या वादावर पडदा टाकण्यासाठी औरंगजेबाचे नाव न घेता मी इतिहासासंदर्भात बोललो होतो. माझ्या वक्तव्याचा धर्माशी काही संबंध असेल तर मैं सॉरी कहता हू असे सांगून हिंदीत त्यांनी माफी मागितली आहे.
औरंगजेबाच्या विधानाबाबत माफी न मागितल्यास आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, त्याचा राजकीय फटका बसू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सय्यद अली अशरफ यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर आव्हाड यांना वास्तवाची जाणीव झाली आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते, त्यांच्या समाजाची मते गमवावी लागतील या भीतीपोटी आव्हाड यांनी माफी मागितली. मुस्लिम समाजासमोर जितेंद्र आव्हाड यांनी थेट घालीन लोटांगण घातले आहे हेच चित्र पहायला मिळाले. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे हे काँग्रेसचा अजेंडा राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात मागे नाही. पण तसे काहीही नाही हे पटवून देण्यासाठी आव्हाड यांनी मध्यंतरी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मतदार संघात येऊन बघा तेथे हिंदूच जास्त आहेत. ८० टक्के हिंदू आहेत, २० टक्केच मुस्लिम आहेत, अशी सारवासारव केली होती. पण जर जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात हिंदूंचे प्रमाण जर जास्त असते तर त्यांनी मुस्लिमांची माफी का मागितली, असा सवाल उपस्थित होतो. मूळात जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा मतदार संघात ८८ टक्के मुस्लिमच आहेत. केवळ दोन टक्के हिंदू आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली सारवासारव या माफीनाम्यावरून सिद्ध होतेय. मुंब्र्यात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपला मतदार दुरावू नये म्हणून जितेंद्र आव्हाड यांना ही लोटांगण घालण्याची वेळ आली आहे.
अशी टिप्पणी जर हिंदूंसंदर्भात त्यांनी केली असती तर त्यावर त्यांनी माफी तर नाहीच पण ते आपल्या विधानावर निश्चल राहिले असते. एकूणच आपल्या मतदारसंघात हिंदूंचे प्रमाण नगण्य असल्यामुळे हिंदू मतांची कदर करण्याची त्यांना कधी गरज नसते. पण मुस्लिम मतांचा विचार करावाच लागतो.
मागे आव्हाड यांनी औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना असे विधान करून आपले इतिहासाचे ज्ञान सर्वांसमोर जाहीर केले होते. त्याचे समर्थनही त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी अजिबात माफी मागितली नाही. औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? शाहिस्ते खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? असे वादगस्त विधान आव्हाड यांनी केले होते. एकूणच शिवाजी महाराजांचा इतिहास अफझलखान, शाहिस्तेखान, औरंगजेब यांना वगळून पूर्ण होणारच नाही हे सांगताना शिवाजी महाराजांचे महत्त्व हे मुघल शासकांच्या उल्लेखाशिवाय सिद्धच होत नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे.
मागे अफझलखानाचे कौतुक करताना तो कसा सहा साडेसहा फूट उंच होता, महाराज कसे कमी उंचीचे होते, हे सांगताना त्यांचा उर जणू भरून आला होता.
ब्राह्मण विरोधामुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या लिखाणाची त्यांनी हेटाळणी केली. हर हर महादेव या सिनेमावरही आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर चित्रपट गृहात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती, त्यावेळी ते वादात सापडले होते. मुंब्रा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आव्हाडांवर एका महिलेने थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना जामीनावर मुक्त केले गेले. आव्हाड यांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांचा अपमान केला म्हणून अनंत करमुसे यांना त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली. त्यावेळी मंत्रीपदाच्या काळातच या प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याचा पुन्हा तपास करा असे आदेश दिले आहेत. एकूणच त्यांनी मुस्लिम समाजाची मागितलेली माफी ही केवळ मतांवर डोळा ठेवूनच मागितली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
अफजल खान हा काही महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर आपल्या सीमा वाढविण्यासाठी आला होता, असे अजब विधान त्यांनी केले होते. त्यामागेही मुस्लिमांना नाराज करायचे नाही, हीच भूमिका होती. त्यामुळे आता त्यांनी मागितलेली ही माफी एक अपेक्षित कृतीच आहे. एरवी भाजपा कशी जातीयवादी राजकारण करते असा ओरडा सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात असतो मात्र आपण कसे मुस्लिमांचे लांगूलचालन करतो आणि एक विशिष्ट समाजाला वारंवार मतांसाठी कसे चुचकारतो हे ते सोयीस्कर विसरतात. शरद पवारांच्या उपस्थितीत एका मुस्लिम कार्यकर्त्याने आरएसएस, भाजपाला हरविण्यासाठी मुस्लिमांनी कसे एकत्र आले पाहिजे असे भाष्य केले त्यावरूनच आगामी निवडणुकात हा मतदार आपल्या जवळ राहावा हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा हेतू आहे. त्या हेतूमध्ये आणि जितेंद्र आव्हाड यांनी मागितलेल्या माफीच्या हेतूमध्ये तसूभरही फरक नाही.