पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बुधवार, १५ जानेवारी रोजी आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. युद्धनौका आणि पाणबुडी ताफ्यात दाखल झाल्याने जागतिक पातळीवर भारताच्या ताकदीची दखल घेतली जाणार असून संरक्षण क्षेत्रातल्या आणि सागरी सुरक्षेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. यामुळे देशाच्या युद्धसज्जतेत वाढ झाली असून नौदलाची ताकद वाढली आहे. यातून आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया अशा उपक्रमांनाही चालना मिळाली आहे.
‘आयएनएस निलगिरी’ युद्धनौका
INS निलगिरी ही P17A प्रकल्पातील पहिली स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. ही युद्धनौका बहुउद्देशीय असून अशा प्रकारच्या आणखी सात युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत. ब्लू वॉटरमध्येही युद्धनौका संचार करू शकणार आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अद्ययावत तोफा आदींचा समावेश युद्धनौकेवर आहे. नौकेची लांबी १४२.५ मीटर असून, ६३४२ टन वजन आहे. ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते.
‘आयएनएस सुरत’ युद्धनौका
INS सुरत ही ‘प्रकल्प १५ बी’ (P15B) मधील चौथी आणि अंतिम युद्धनौका आहे. गेल्या तीन वर्षांत नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘मोरमुगाओ’ आणि ‘इम्फाळ’ या युद्धनौकांनंतर ‘आयएनएस सुरत’ ही युद्धनौका नौदलात दाखल झाली आहे. या प्रकल्पातील ही अंतिम युद्धनौका आहे. सर्वांत मोठी आणि अतिशय आधुनिक अशी ही युद्धनौका आहे. ही युद्धनौका ७५ टक्के देशी बनावटीची आहे. युद्धनौकेचे वजन ७४०० टन असून ती १६४ मीटर लांब आहे. अद्ययावत शस्त्रांनी सज्ज आहे. युद्धनौकेवर चार गॅस टर्बाइन असून ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता असलेली ही पहिली युद्धनौका आहे.
हे ही वाचा..
युद्धनौका, पाणबुडी निंर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा
मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला
जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’
जम्मू-काश्मीर निवडणुका, अमरनाथ यात्रा सुधारित सुरक्षा परिस्थितीचा दाखला
‘आयएनएस वाघशीर’ पाणबुडी
INS वाघशीर ही पी-७५ स्कॉर्पिन प्रोजेक्ट अंतर्गत कलवारी वर्गातील सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. फ्रान्सच्या नौदलाच्या गटाबरोबर संयुक्तपणे या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ‘कलवरी’, ‘खांदेरी’. ‘करंज’, ‘वेला’, ‘वागीर’ या पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या आहेत. पाणबुडीची आवाजाची पातळी अतिशय कमी असून शत्रूवर अचूकतेने हल्ला करण्याची क्षमता पाणबुडीमध्ये आहे. टॉर्पिडोसह पाण्यावर असताना जहाजविरोधी क्षेपणास्त्राचाही मारा ही पाणबुडी करू शकते. ही पाणबुडी ६७.५ मीटर लांब असून, वजन १६०० टन आहे. २० नॉटिकल मैलाने ती जाऊ शकते. डिझेल आणि विद्युत ऊर्जेवर पाणबुडी चालणार आहे.