भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीसाठी कसोटी सामने सुरू आहेत. सध्या या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जात असून हा सामना म्हणजे भारतीय संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती आहे. अशातच संघाची धुरा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे नसून गोलंदाज जसप्रीत बुमरा याच्याकडे आहे. रोहित शर्मा याने या सामन्यात विश्रांती घेतली आहे. मात्र, रोहित शर्माची आधीच्या सामन्यांमधील कामगिरी पाहता सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा अर्थ तो निवृत्ती घेणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत होता. शिवाय चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, खुद्द रोहित शर्मा यानेच या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान, माजी खेळाडू इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांना दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा त्याच्या सिडनी टेस्टमधील अनुपस्थितीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने यावर स्पष्ट भाष्य करत त्याची भूमिका मांडली. रोहित शर्मा याला विचारण्यात आले की, तुला संघातून वगळण्यात आले आहे, तू विश्रांती घेतली आहेस की त्याने स्वतःच बाहेर राण्याचा निर्णय घेतला आहे? प्रत्युत्तरात रोहित शर्मा म्हणाला की, “काही नाही (हसत). मी स्वतः बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून धावा होत नाहीत, म्हणून मी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी दोन मुलांचा पिता आहे. मला समज आहे, मी परिपक्व आहे. मला माहिती आहे कधी काय करायचं. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूने इतकी महत्त्वपूर्ण मॅच खेळू नये. म्हणून मीच बाहेर बसण्याचा निर्णय घेतलाय,” त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पुढे रोहित शर्मा म्हणालं की, “मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून धावा निघत नाहीत, म्हणून मी बाहेर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धावा होत नाहीत, पण पाच महिन्यांनंतर किंवा दोन महिन्यांनंतरही धावा होणार नाहीत याची शाश्वती नाही. मी खूप मेहनत करेन. बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोकांना अधिकार नाही की मी कधी निवृत्ती घ्यावी किंवा कोणते निर्णय घ्यावेत. माझा निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. मी फॉर्ममध्ये नसल्यामुळेच मी बाहेर आहे. भविष्यात काय होईल हे तुम्हाला माहीत नाही. मी धावाही करू शकतो किंवा कदाचित नाही. पण मला विश्वास आहे की मी परत येऊ शकेन. असे म्हटल्यावर मलाही वास्तववादी व्हायला हवे.”
“माझे संभाषण अगदी सोपे होते. मी म्हणालो की मी धावा करू शकत नाही आणि आम्हाला या महत्त्वाच्या सामन्यात धावा करू शकतील अशा खेळाडूंची गरज आहे. मला हे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना सांगायचे होते. यात त्यांनी मला साथ दिली. हा एक शहाणपणाचा निर्णय होता. मी फक्त संघासाठी काय करावे याचा विचार केला,” असं रोहित शर्मा म्हणाला.
हे ही वाचा :
मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा
दिल्ली झाली ‘गायब’, धुक्यामुळे दिसेनासे झाले
हिंदू साधू चिन्मय दास प्रकरणाची निष्पक्ष चाचपणी व्हावी
तिरंगा यात्रेतील चंदन गुप्ता हत्याप्रकरणात सर्व २८ आरोपींना जन्मठेप!
रोहित शर्मा या टेस्ट सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. त्याचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. या टेस्ट सीरीजमधील आतापर्यंत तीन सामन्यात त्याने ३, ६, १०, २ आणि ९ धावा केल्या आहेत. मागच्या आठ कसोटी सामन्यात तो फक्त एक अर्धशतक झळकवू शकला आहे. त्यामुळे त्याने या महत्त्वाच्या सामन्यात बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.