एमसीएच्या लोकायुक्त ताहिलरामाणी काय निर्णय घेणार?

एमसीएच्या लोकायुक्त ताहिलरामाणी काय निर्णय घेणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनने नियुक्त केलेल्या लोकायुक्त आणि माजी न्यायाधीश विजया ताहिलरामाणी यांच्याकडून काही निर्णयांची आता क्रिकेट वर्तुळाला प्रतीक्षा आहे. विशेषतः भारताचे माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत आणि राजू कुलकर्णी यांनी त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी केलेल्या अर्जांवर लोकायुक्त काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या दोघांनी केलेल्या तक्रारीला एक महिना होऊन गेल्यावर पुन्हा एकदा लोकायुक्तांना आपल्या तक्रारीची आठवण करून देणारी पत्रे पाठविली आहेत. त्यामुळे आता लोकायुक्त यावर कोणती पावले उचलतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य या नात्याने अनुक्रमे राजपूत आणि कुलकर्णी यांनी ही पत्रे लिहिले आहेत. आपल्या समितीला का बरखास्त करण्यात आले, अपेक्स कौन्सिलला तो अधिकार होता का, सध्या नियुक्त केलेल्या अनधिकृत क्रिकेट सुधारणा समितीला जोपर्यंत आमच्या पत्रांवर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतेही निर्णय घेण्यास मनाई करावी, अशी मागणी या पत्रांत करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘छत्रपती संभाजी महाराजांबाबतचे ‘ते’ उल्लेख पुराव्यांच्या कसोटीवर न टिकणारे’

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

चीननेच बनवला हा ‘वूहान वायरस’

देशात पाच हजार पेक्षा जास्त काळ्या बुरशीचे रुग्ण

जतीन परांजपे, विनोद कांबळी, नीलेश कुलकर्णी यांच्या नव्या क्रिकेट सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार आता मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. येत्या २४ मेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे मुंबई रणजी संघासाठी वर्षभरात तिसरा प्रशिक्षक लाभेल. पण प्रश्न आहे तो याआधीच्या क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष व सदस्य अनुक्रमे लालचंद राजपूत आणि राजू कुलकर्णी यांनी एमसीएच्या लोकायुक्त न्या. (निवृत्त) विजया तहिलरामाणी यांना लिहिलेल्या पत्राचे काय होणार याचा? या पत्रात राजपूत आणि कुलकर्णी यांनी आपल्या समितीला बरखास्त करणे योग्य नव्हते, असे म्हटले आहे. अपेक्स कौन्सिलला आपल्या समितीला बरखास्त करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे लोकायुक्तांनी या बरखास्त केलेल्या समितीलाच पुन्हा नियुक्त करावे आणि नव्या समितीची नियुक्ती रद्द ठरवावी, असेही या पत्रात म्हटले आहे. अद्याप लोकायुक्तांकडून राजपूत आणि कुलकर्णी यांना बोलावणे आलेले नाही. त्यांची बाजूही ऐकून घेण्यात आलेली नाही.

या प्रशिक्षकासाठी जे निकष एमसीएने घालून दिले आहेत, त्यानुसार प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही ५० प्रथम श्रेणी सामने खेळलेली असावी. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकपदाचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असावे. राज्य संघाला किंवा आयपीएल संघाला किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक म्हणून त्याला अनुभव असला पाहिजे. शिवाय, ही व्यक्ती मुंबईतील रहिवासी असावी.

ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी सोमवार २४ मेच्या संध्याकाळी ५ पर्यंत अर्ज करायचा आहे. एमसीएच्या वेबसाईटवर प्रशिक्षकपदासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे.

मुंबईच्या प्रशिक्षकपदावरून गेल्या काही महिन्यात बरेच वादविवाद झडले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेवेळी अमित पागनीस यांची संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्या स्पर्धेत मुंबईचा संघ प्राथमिक फेरीतच गारद झाला. त्यानंतर पागनिस यांनी राजीनामा दिला. नंतर रमेश पोवार यांची नियुक्ती विजय हजारे वनडे स्पर्धेपूर्वी करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने थेट स्पर्धेचे विजेतेपदच पटकाविले. पण आता रमेश पोवार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाल्यामुळे मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त आहे. या पदासाठी आता कोण अर्ज करते आणि कुणाच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Exit mobile version