अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

बहुचर्चित असा ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाच्या टीझरवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेला रावणाचा लूक लोकांना पसंत पडलेला नाही. यावर आता रामायणात श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी या चित्रपटाच्या टीझरबाबत आपलं मत मांडलं आहे.

अरुण गोविल यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, “रामायण, महाभारत, भगवतगीता असेल असे जे काही ग्रंथ किंवा शास्त्र आहेत ते सर्व आपला धार्मिक वारसा आणि संस्कृती आहेत. हे ग्रंथ आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. त्यामुळे हा पाया हलवला जाऊ शकत नाही किंवा त्याला धक्का लागेल असं काहीही करता येऊ शकत नाही. आपल्या संस्कृतीच्या पायाशी किंवा मूळांशी कोणत्याही प्रकारची मोडतोड करणं चुकीचं आहे. शास्त्रातून आपल्याला संस्कार मिळतात, जगण्याचा एक दृष्टीकोन मिळतो,” असं मत अरुण गोविल यांनी व्यक्त केलं आहे.

“अनेकदा क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली धर्माची खिल्ली उडवली जाते. इतर धर्मांची मूल्ये बदलता येत नाहीत मग सनातन धर्माबद्दलचं असं का केलं जात. असे करायला नकोच आणि कोणाला करूही देऊ नये. तुम्हाला आमचा धार्मिक पाया आणि संस्कृती याची मोडतोड करण्याचा काहीच अधिकार नाही,” असे खडेबोल अरुण गोविल यांनी सुनावले आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच श्रीराम जन्मभूमी अयोध्येत लॉन्च करण्यात आला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, अभिनेता सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, टीझर प्रदर्शित होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होत आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version