अजानसाठी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.निरीक्षण करत न्यायालयाने नोंदवले की, मशिदींमध्ये प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकर १० मिनिटांपेक्षा कमी काळ चालतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही.मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध मायी यांच्या खंडपीठाने गांधीनगर येथील डॉक्टर धर्मेंद्र प्रजापती यांनी दाखल केलेली याचिका रद्द केली.डॉक्टर धर्मेंद्र प्रजापती यांनी त्यांच्या रुग्णालयाजवळील मशिदीतून दिवसातून पाच वेळा अजान वाजवण्यावर आक्षेप घेतला होता.
दिवसातून पाच वेळा अजान वाजवल्याने लोकांचे विशेषतः रुग्णांचे हाल होत असल्याचे डॉक्टर धर्मेंद्र प्रजापती यांनी म्हटले होते.याबाबत गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती.मात्र, डॉ.प्रजापती यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध मायी यांच्या खंडपीठाने म्हटले की, याचिकेतील दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. एका वेळी जास्तीत जास्त दहा मिनिटे अजान दिवसाच्या वेगवेगळ्या तासांत दिली जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये
राज्यात ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार
सरकारने ७० लाख मोबाईल नंबर केले रद्द!
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित
कोर्टाने असेही म्हटले आहे की, ‘सकाळी लाऊडस्पीकरद्वारे अजान देणारा मानवी आवाज ध्वनी प्रदूषणाच्या पातळीपर्यंत (डेसिबल) कसा पोहोचू शकतो, त्यामुळे जनतेचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर धोक्यात कसे येऊ शकते, हे आम्हाला समजण्यात अपयश आले आहे.’ न्यायालयाने म्हटले की, ‘आम्ही या प्रकारच्या जनहित याचिकांचा विचार करत नाही. वर्षानुवर्षे चालत आलेली आणि पाच-दहा मिनिटांसाठी घडणारी ही श्रद्धा आणि प्रथा आहे.
त्यात याचिकाकर्त्याच्या वकिलाला विचारले, “तुमच्या मंदिरात पहाटे तीन वाजता ढोल-ताशा आणि संगीताने आरती सुरू होते. घंटा आणि घुंगरांचा आवाज फक्त मंदिर परिसरातच राहतो आणि मंदिराबाहेर पसरत नाही, असे तुम्ही म्हणू शकता का?” न्यायालयाने म्हटले की, ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी वैज्ञानिक पद्धत आहे, परंतु याचिका हे दाखवण्यात अपयशी ठरली आहे. १० मिनिटांच्या अजानमुळे ध्वनी प्रदूषण होते हे सिद्ध करण्यासाठी कोणताही डेटा प्रदान केलेला नाही.