पेन्टोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने पश्चिम रेल्वे रखडली

पेन्टोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने पश्चिम रेल्वे रखडली

बोरिवली आणि कांदिवली स्टेशनच्या दरम्यान पेन्टोग्राफमध्ये झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे सकाळी १०.२८ ते १२ या वेळेत पश्चिम रेल्वेला फटका बसला.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १०.२८ला चर्चगेटहून बोरिवलीला येणाऱ्या गाडीच्या पेन्टोग्राफमध्ये बिघाड झाला. पे बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८वर ही गाडी जात असताना पेन्टोग्राफ आणि ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे हा गोंधळ उडाला आणि गाडी तिथेच थांबली. त्यानंतर त्यापाठोपाठ येणाऱ्या सर्व गाड्यांवर त्याचा परिणाम झाला. चर्चगेटकडे जाणाऱ्या ४ लोकल आणि बोरिवलीकडे जाणाऱ्या ३ लोकलना याचा फटका बसला. त्यानंतर हा बिघाड दूर करण्यासाठी साधारणपणे ११ वाजता अंधेरीहून गाडी रवाना झाली.

बोरिवलीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या संथगतीने चालत होत्या तर चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्याही संथ होत्या. बोरिवली-कांदिवलीदरम्यान गाड्या थांबवण्यात आल्यामुळे प्रवाशांना ट्रॅकवर उतरून स्टेशनच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागले. तर बोरिवलीच्या दिशेने येणाऱ्या जलदगती गाड्याही संथगतीने प्रवास करत होत्या तसेच काही गाड्या बोरिवलीला न थांबता गोरेगावपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेमके काय झाले आहे याची कोणतीही माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. अचानक गाड्यांमध्ये झालेल्या बदलांची घोषणा केल्यामुळे प्रवाशांना नेमका कोणता अडथळा आला आहे हे कळायला मार्ग नव्हता. शेवटी जलद गाडीतून उतरून स्लो गाडीसाठी प्रवाशांना धावाधाव करावी लागली. स्लो गाड्याही कांदिवली ते बोरिवलीच्या दरम्यान काहीकाळ थांबवाव्या लागल्या. या बिघाडामुळे या महत्त्वाच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.

हे ही वाचा:

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले जीवन

भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान

ममता बॅनर्जींचे स्वागत आणि भाजपचे मुख्यमंत्री आले तर टीका

ममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार

 

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे आधीच गाड्या उशिराने धावत होत्या. त्यात हा बिघाड झाल्यामुळे सकाळच्या वेळेत लोकांची चांगलीच धावपळ झाली.

Exit mobile version