कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले नियम शिथिल करताना राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली असली तरी प्रवाशांना मासिक पास घ्यावा लागत असून तिकीट दिले जात नाही. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पश्चिम रेल्वेने ४.७९ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल २४ कोटींचा दंड वसूल केला आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच तिकीट दिली जाते. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असली तरी प्रवाशांना केवळ पास दिला जातो. अनेकांना महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदाच प्रवास करायचा असल्यास अशावेळी अनेक प्रवाशांना पास काढणे परवडत नसल्याने हे प्रवासी विनातिकीट प्रवासाचा मार्ग निवडतात. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे.
हे ही वाचा:
शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?
मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…
‘महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी केली होती दयायाचिका’
एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या ४.७९ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ५६५ अनधिकृत फेरीवाल्यांचाही समावेश असून अन्य सर्व नोकरदार वर्ग आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या कारवाई दरम्यान २४.६० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लसीचे दोन डोस घेण्यात आलेल्या नागरिकांना पास देण्यात येतो मग तिकीट का दिली जात नाही. याचे उत्तर नियमावली तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना देता आले नाही. या नियमावलीत बदल करणे आवश्यक असून लोकलचे तिकीट देण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.