पहिल्यावहिल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा मानकरी असणारा वेस्ट इंडिजचा संघ २०२३मधील विश्वचषक स्पर्धेसाठी अपात्र ठरला आहे. वेस्ट इंडिजने याआधी १९७५, १९७९ विश्वचषकावर नाव कोरले असून १९८३मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यावेळी त्यांना भारतीय संघाने पराभूत केले होते.७० ते ८०च्या दशकात क्रिकेटवर वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाची अधोगती सुरूच आहे. शनिवारी पात्रता फेरीतील सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. हरारे येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ स्कॉटलंडकडून सात विकेटनी पराभूत झाला.
गेल्या वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धेतही स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले होते.विश्वचषक स्पर्धेत १० संघांना खेळवले जाते. त्यात एकदिवसीय सुपर लीगमध्ये पहिल्या आठ क्रमांकावरील संघांना विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो. तर, अन्य दोन संघांना त्यासाठी पात्रता फेरीचा सामना करावा लागतो. एकदिवसीय सुपर लीगमध्ये वेस्ट इंडिजचा संघ नवव्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांनादेखील पात्रता फेरीचा सामना करावा लागला. आजवरच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ नसेल.
हे ही वाचा:
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी स्वीकारून ४३.५ षटकांत स्कॉटलंडसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र स्कॉटलंडच्या ब्रँडन मॅकम्युलन याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवून विजयश्री खेचून आणली. त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. तर, ६३ धावा केल्या. तर, मॅथ्यु क्रॉस याने ७४ धावा तडकावल्या.वेस्ट इंडिजची सुरुवातही वाईट झाली. त्याची चार गडी बाद ३०धावा अशी अवस्था होती. त्यानंतर २१ व्या षटकापर्यंत संघ सहा गडी बाद केवळ ८१ धावाच करू शकला. त्यानंतर जेसन होल्डर (४५) आणि रोमारिओ शेफर्ड (३६) यांच्या ७७ धावांच्या भागिदारीने वेस्ट इंडिजचा खेळ सावरला.
पात्रता फेरीच्या प्राथमिक साखळीत विंडिज ‘अ’ गटात होते. त्यांनी या गटात अमेरिका आणि नेपाळला हरवले. पण झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सविरुद्ध पराभूत झाले. त्यामुळे अव्वल साखळी सुरू झाली, त्या वेळी त्यांचे शून्य गुण होते. त्यामुळे त्यांना अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमानविरुद्ध विजय आवश्यक होता. विंडिज आता स्कॉटलंडविरुद्ध पराभूत झाले. त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त चार गुण होतील. ते सुपर साखळीत पहिल्या दोन संघांत येणार नाहीत, हे स्पष्ट झाले.
स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज ४३.५ षटकांत १८१ (जेसन होल्डर ४५, रोमारिओ शेफर्ड ३६, ब्रँडन किंग २२, निकोलस पूरन २१, ब्रँडन मॅकम्युलन ३२-३, ख्रिस सोल ४३-२, मार्क वॉट २५-२, ख्रिस ग्रिव्ह्स ३०-२) पराभूत विरुद्ध स्कॉटलंड ४३.३ षटकांत ३ बाद १८५ (मॅथ्यु क्रॉस नाबाद ७४, ब्रँडन मॅकम्युलन ६९)