शामर जोसेफने ६८ धावांत घेतलेल्या ७ बळींमुळे वेस्ट इंडिजने गॅबावरील दिवसरात्र कसोटीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळविला. २७ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात वेस्ट इंडिजला यश आले आहे. स्टीव्ह स्मिथने ९१ धावांच्या नाबाद खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला पराभव टाळता आला नाही.
या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने ही दमदार कामगिरी करून दाखविली. विंडीजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने २८९ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावात मात्र विंडीज १९३ धावांवर आटोपले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर २१६ धावांचे आव्हान होते. पण जोसेफने २ बाद ११३ अशा भक्कम स्थितीतून ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. कॅमेरून ग्रीनला त्रिफळाचीत केल्यावर त्याने ट्रॅविस हेडला त्याच धावसंख्येवर माघारी पाठवले आणि तिथून ऑस्ट्रेलियाची घसरण सुरू झाली. हेडला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ मिचेल मार्श (१०) आणि ऍलेक्स कॅरे (२) यांना जोसेफनेच बाद केले. त्यामुळे २ बाद ११३ वरून ऑस्ट्रेलियाची स्थिती ६ बाद १३६ अशी झाली.
मिचेल स्टार्कने २१ धावांची खेळी केली आणि स्टीव्ह स्मिथला साथ दिली पण १७१ धावांवर ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज बाद झाला. स्टार्कला जोसेफनेच सिन्क्लेअरकडे झेल देण्यास भाग पाडले. पाठोपाठ पॅट कमिन्सला बाद केले तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती ८ बाद १७५ होती. विजयासमीप पोहोचल असलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला जेव्हा नॅथन लायन बाद झाला. जोसेफनेच त्याचा अडसर दूर केला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ९ बाद १९१ धावा झालेल्या होत्या. स्मिथने आपल्या संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला खरा पण सोबत असलेला जोश हेझलवूड शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. अवघ्या ८ धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या २० कसोटीत प्रथमच वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.
हे ही वाचा:
आमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!
‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी
आसाम युवक कॉंग्रेसच्या अंकिता दत्ता भाजपमध्ये प्रवेश करणार
काशी विश्वनाथ मंदिरासह नागर शैलीत साकारले आहे ज्ञानवापी!
विंडीजने रचला इतिहास
याआधी वेस्ट इंडिजने १९९७च्या हंगामात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. दिवसरात्र खेळल्या जाणाऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ म्हणूनही विंडीजने आपले नाव नोंदविले आहे. या गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या कसोटीतील सलग ११ सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाची ही विजयमालिका विंडीजने खंडित केली.
ब्रायन लाराला अश्रु अनावर
दरम्यान, या विजयामुळे वेस्ट इंडिजचा माजी शैलीदार खेळाडू ब्रायन लाराला अश्रु आवरले नाहीत. या सामन्याचे समालोचन तो करत होता. आपला संघ जिंकलेला पाहून त्याचे डोळे भरून आले.
वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातील हा खूप मोठा विजय आहे, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी लाराने समालोचन कक्षातील आपला सहकारी व ऑस्ट्रेलियाचा माजी तडाखेबंद खेळाडू व यष्टिरक्षक ऍडम गिलख्रिस्ट याला मिठी मारली. तो म्हणाला की, अविश्वसनीय अशी कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटची मान आज अभिमानाने उंचावली आहे. विंडीज संघातील प्रत्येक सदस्याचे खूप अभिनंदन.