पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवार, २ सप्टेंबरपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनादरम्यान ममता बॅनर्जी यांचे सरकार एक विधेयक आणणार आहे. या अंतर्गत बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यास दोषीला १० दिवसांच्या आत फाशी दिली जाणार आहे. विधेयक मांडण्यापूर्वीच विरोधकांनी त्याला मान्यता दिली आहे. मात्र, विरोधकांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या बलात्काराच्या घटनांवरही ममता बॅनर्जी यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
अहवालानुसार, ममता बॅनर्जी यांचे सरकार मंगळवारी हे विधेयक आणण्याची शक्यता आहे. यात बलात्काराच्या आरोपींना अवघ्या १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत या विधेयकाला भाजपा पाठिंबा देईल, मात्र अशा संवेदनशील बाबींवर ममता सरकारच्या राजीनाम्याची मागणी सुरूच राहणार असल्याचं भाजप नेते सुकांत मुझुमदार यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा :
जेजेपी आमदार देवेंद्र सिंह बबली यांचा भाजपमध्ये प्रवेश !
बॅडमिंटनमध्ये भारताचा जलवा, नितेश कुमारने मारलं गोल्ड !
दंगलींसाठी उतावीळ कोण? का हव्या आहेत दंगली?
शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या नराधम अय्याज काझीचे खोके उध्वस्त
दरम्यान, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, “कालपासून आजपर्यंत सात घटना घडल्या आहेत, यामध्ये टीएमसीचा संबंधही आहे. कूचबिहारमध्ये टीएमसी पंचायत सदस्याच्या पतीला अटक करण्यात आली आहे, मध्यग्राममध्ये टीएमसी पंचायत सदस्याला अटक करण्यात आली आहे. याच्या मुळाशी ममता बॅनर्जी आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. कालपासून आजपर्यंत अशा सात घटना घडल्या आहेत. संपूर्ण राज्यात कूचबिहार, मध्यमग्राम, हावडा, इलमबाजार अशा ठिकाणी घटना घडल्या आहेत. यात तृणमूल पंचायत आणि नेते थेट सामील आहेत. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. ममता बॅनर्जींचा राजीनामा आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे पश्चिम बंगालचे वास्तव आहे ते स्वीकारावे लागेल.”