मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले होते. आता महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्याचा मान चानूला मिळाला आहे. चानू हिने मणिपूर पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या उपस्थितीत तिने हा पदभार स्वीकारला.
एएसपीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चानूने ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ‘मणिपूर पोलिसांत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (क्रीडा) म्हणून रुजू होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मला देश आणि नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी मणिपूर राज्य आणि आमचे माननीय मुख्यमंत्री बिरेन सिंग सर यांचे आभार मानते.’
माळरानावर लाकडं गोळा करणारी मीरा ते ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू असा तिचा प्रेरणादायी प्रवास. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं कौतुक झालं होत. पंतप्रधान मोदींनीही तीच कौतुक केलं होत. तर मणिपूरच्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी, तिला एक कोटी रुपये देऊन सन्मान केला होता आणि त्यांनी पोलिस विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त केले जाईल अशी घोषणा गेल्या वर्षी जुलैमध्ये केली होती. सिंग यांनी राज्यात जागतिक दर्जाची वेटलिफ्टिंग अकादमी स्थापन करणार असल्याचे सांगितले होते.
हे ही वाचा:
सुनील गावस्कर म्हणतात, ऋषभ पंत कसोटी कर्णधार म्हणून योग्य!
मॉलमध्ये पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर…
किरण मानेचे मालिका निर्मात्यांवर नवे आरोप!
दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस
चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तिने क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो आणि स्नॅचमध्ये ८७ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले होते. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती भारतातील पहिली वेटलिफ्टर आहे. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.