राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वर्षांचा प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. १९२५ या साली दसऱ्याच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. यानिमित्त मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, सर्व स्वयंसेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. RSS चा इतक्या वर्षाचा इतिहास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासावर एक वेब सिरिज तयार करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी ‘वन नेशन’ नावाच्या वेब सीरिजचे पहिले पोस्टर रिलिज करण्यात आले आहे. या वेब सिरिजमध्ये RSS चा शतकभराचा प्रवास आणि संघाने राष्ट्रासाठी केलेले योगदान दाखवले जाणार आहे.
या सिरीजची विशेष बाब म्हणजे या वेब सिरिजचे दिग्दर्शन तब्बल सहा दिग्दर्शक करणार आहेत आणि ते सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. प्रियदर्शन, विवेक अग्निहोत्री, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यू माथन, मंजू बोरा आणि संजय पूरण सिंग चौहान हे सहा जण मिळून ही वेब सिरीज दिग्दर्शित करणार आहेत.
हे ही वाचा:
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
तालिबानला खुपतोय अफगाणिस्तानचा विजय
‘वन नेशन’ या सिरीजचे पहिले पोस्टर समोर आले असून या पोस्टरमध्ये एक तरुण संघाचे कपडे घालून उभा दिसत आहे. मात्र, या सिरीजमध्ये कोणकोणते कलाकार महत्वाची भुमिका साकारणार आणि चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त 2025 मध्ये ‘एक राष्ट्र’ वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.