पद्म पुरस्कार मिळालेले पश्चिम बंगालच्या नादिया येथील बिरेन कुमार बसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांना बसाक यांनी दिलेली भेट आवडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटवस्तूचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले आहे की, बिरेन कुमार बसाक हे पश्चिम बंगालच्या नादिया येथील आहेत. ते एक प्रतिष्ठित विणकर आहेत, जे त्यांच्या साडींमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे विविध पैलू दर्शवतात. पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी मला भावेल अशी वस्तू सादर केली.
Shri Biren Kumar Basak belongs to Nadia in West Bengal. He is a reputed weaver, who depicts different aspects of Indian history and culture in his Sarees. During the interaction with the Padma Awardees, he presented something to me which I greatly cherish. pic.twitter.com/qPcf5CvtCA
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2021
मोदींनी आम्हाला पाठींबा दिला. या भेटीपेक्षा अजून काही विशेष असू शकत नाही. या पुरस्कारामुळे विणकरांसाठी अच्छे दिन आले असल्याचे बिरेन कुमार बसाक यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले. बसाक यांनी सादर केलेल्या साडीवर मोदींची जनतेशी संवाद साधत असतानाची प्रतिमा आहे. तसेच सर्व संकृतीच्या लोकांच्या प्रतिमाही साडीवर विणण्यात आल्या आहेत.
कोण आहेत बिरेन कुमार बिसाक?
बिरेन हे एकेकाळी रस्त्यावर फिरून साड्या विकायचे. ते मूळचे कोलकाता येथील नादिया जिल्ह्यातील असून व्यवसायाने साडी विणकाम करतात. प्रचंड मेहनतीने आणि संघर्षानंतर त्यांनी आपली साडी कंपनी ‘बसाक अँड कंपनी’ची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांनी साडीवर रामायणाचे सात खंड लिहिले होते, ज्यासाठी ब्रिटिश विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी दिली होती. ही साडी विणण्यासाठी त्यांना सुमारे दोन वर्षे लागली होती.
बसाक यांच्या साडीवरील या जादुई कलाकृतीने त्यांना यापूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार, संत कबीर पुरस्कार मिळाले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड युनिक रेकॉर्ड्समध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले आहे.