उत्तर पाकिस्तान आणि त्याचा परिसर आणि पंजाब व आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. तर, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरयाणात पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे चिनाब नदीचा प्रवाह थांबला आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह ५००हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंद होता.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार व सिक्कीममध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. उत्तर प्रदेशात वाईट हवामान आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना २४ तासांत भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर, लखीमपूर खिरी, हरदोई, सीतापूर, गोंडा अयोध्या आणि शाहजहांपूर येथे वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ आणि गंगोत्री महामार्ग बंद झाला आहे. बद्रीनाथमध्ये सुमारे पाच फूट, हेमकुंड साहिबमध्ये सहा आणि केदारनाथ धाम येथे दोन फुटांपर्यंत बर्फ जमला आहे.
हे ही वाचा:
शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!
लाच प्रकरणी NHAI च्या अधिकाऱ्यासह सहा जण अटकेत
निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!
गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!
हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. हिमकडा कोसळल्यामुळे चिनाब नदीचा प्रवाह गेल्या १२ तासांपासून बंद पडला आहे. तसेच, किन्नौर येथे १०१ पर्यटक अडकले आहेत.
हरयाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात शेतात काम करताना आई सरोज (५२) आणि मुलगा रमण सैनी (२८) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर, जम्मू काश्मीरमधील रियासी भागात मोठ्या पावसामुळे एक घर ढासळले. त्यात एका महिलेसह तीन मुलींचा मृत्यू झाला. तर, अन्य दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. २७० किमी लांब जम्मू-काश्मीर राष्ट्रीय राजमार्ग भूस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे.