उत्तर पूर्व दिल्लीचे काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांना प्रचारादरम्यान मारहाण झाली. त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी मारहाण केली. तसेच ‘आप’च्या आमदार छाया शर्मा यांच्याशीही गैरवर्तन केले. या दोघांची नावे दक्ष चौधरी व अन्नू चौधरी असून ते स्वतःला गोरक्षक मानतात. या दोघांनी जे काही केले, त्यासाठी आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे.
कन्हैया कुमारवर हल्ला केल्याचा आम्हाला कोणताही पश्चाताप वाटत नाही, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यांना पोलिसांनी अद्याप संपर्क केलेला नाही, असे सांगत पोलिसांनी आपल्याला बोलावले तर आपण स्वतःहूनच पोलिसांना शरण जाऊ, असेही स्पष्ट केले आहे. जेव्हा कन्हैयाचे भाषण ऐकले होते, तेव्हापासूनच ठरवले होते की त्याच्या कानशिलात मारायची आहे. त्याने जेएनयूमध्ये घोषणा केल्या होत्या, हे सर्वांनी पाहिले आहे. तो अफजलच्या समर्थनार्थ घोषणा देत होता, लष्करविरोधी घोषणा देत होता, कन्हैया ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देतो, देशाचे तुकडे करण्याची भाषा करतो, असा आरोप दक्ष आणि अन्नू चौधरी यांनी केला आहे.
दोघांनी असा आरोप केला की, कन्हैया लष्कराचा अपमान करतो. कन्हैयाचे भाषण मोबाइलवर दाखवून ते म्हणाले की, लष्कराचे जवान काश्मीरमध्ये बलात्कार करतात. असे बोलणाऱ्याला आम्ही नक्की धडा शिकवू. काश्मीरमध्ये दररोज एक जवान शहीद होत असताना हा लष्कराचा अवमान करतो. त्यामुळे आम्ही कट आखूनच गेलो होतो. आम्ही केवळ शाईफेक आणि कानशिलात मारण्यासाठी गेलो होतो. मात्र जमावाने आमचे डोके फोडले. परंतु आम्हाला कोणताही पश्चाताप नाही. देशाचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, असे ते दोघे म्हणाले.
हे ही वाचा:
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात
भाजपावर खापर फोडत केजरीवालांनी केली ‘जेल भरो’ची घोषणा
‘कोणत्याही पक्षाशी संबंध नाही’
पोलिस आणि न्यायालयावर आम्ही निर्भर राहणार नाही. अशा देशद्रोहींना आम्ही धडा शिकवू. कन्हैयावर हल्ला करणे हे कायदा मोडणे नाही. तुकडे तुकडेची घोषणा देणारा आणि लष्कराचा अवमान करणारा काय संसदेत जाणार? आमचे कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही आणि आम्ही कोणत्याही पक्षाच्या सांगण्यानुसारही हे काम केलेले नाही. मनोज तिवारी यांच्यासोबत कधी फोटो काढला असेल, आम्हाला आठवतही नाही. आम्ही गोरक्षणाचे काम करतो. आम्ही प्रकाशझोतात येण्यासाठी हे काम केलेले नाही. आमचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर आहेत, असा दावा त्यांनी केला.
गाझियाबाद पोलिसांकडून आधी झाली होती अटक
दक्ष चौधरी गोरक्षकासह ऑनलाइन कपडेविक्रीचेही काम करतो. तर, अन्नू केवळ गोरक्षक आहे. ते तीन-चार गोशाळा चालवतात, असा त्यांचा दावा आहे. गोरक्षा आणि धर्मासाठी ते हे काम करतात, असा त्यांचा दावा आहे. दक्षचे इन्स्टाग्रामवर चार लाख फॉलोअर आहेत तर, अन्नूचे १२.४ हजार फॉलोअर आहेत. शांतता भंग केल्याप्रकरणी याआधी दोघांना गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे.