अंकिता कोंवरच्या ‘या’ वक्तव्यावर होत आहे टीका

अंकिता कोंवरच्या ‘या’ वक्तव्यावर होत आहे टीका

ईशान्य भारतीय खेळाडू मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देताना रौप्य पदकाची कमाई केली आणि भारतभर तिच्या नावाचा जयघोष सुरु झाला. पण मॉडेल मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरच्या मते ईशान्य भारतातील लोकांबद्दल देशात वेगळीच भावना आहे. त्यावरून ती टीकेचे लक्ष्य बनली आहे.

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो, अन्यथा आम्ही देशवासियांसाठी चीनी, नेपाळी, चिंकी किंवा कोरोना असतो अशी भावना मिलिंद सोमणची पत्नी आणि अभिनेत्री अंकिता कोंवरने व्यक्त केली आहे. अंकिता कोंवरच्या या ट्विटवरून जोरदार टीका केली जात आहे.

भारतात केवळ जातीभेदच नाही तर वर्णभेदही मोठ्या प्रमाणावर आहे हे मी माझ्या अनुभवावरुन सांगते असं म्हणत अंकिता कोंवरने राग व्यक्त केला असला तरी अनेक नेटकऱ्यांनी मात्र तिला या ट्विटवरून झोडपून काढले आहे. ही तिची वैयक्तिक भावना असून भारतातील सर्वसाधारण लोकांचे मात्र असे अजिबात मत नाही, अशी टिप्पणी अनेकांनी तिच्या या ट्विटवर केली आहे.

आज भारतात पूर्वोत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांना अनेक क्षेत्रांमध्ये प्राध्यान्याचं स्थान आहे. बॉलीवूड, क्रीडा, राजकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये आज पूर्वोत्तर भारताचे नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. केंद्रीय मंत्रिमंडळातही यावेळी पूर्वोत्तर भारतातून सर्वाधिक खासदार मंत्री झाले आहेत. त्याचबरोबर त्रिपुरामधून निवडून आलेल्या खासदाराला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद मिळालं आहे. खेळातही आज ईशान्येकडील राज्यांतून असंख्य खेळाडू भारताला मिळाले आहेत. पण त्यांच्याबद्दल कुणीही कोंवरसारखी भावना कुणीही व्यक्त केलेली नाही. उलट या खेळाडूंबद्दल सगळ्यांच्या मनात नितांत आदरच आहे.

अंकिता कोंवरने त्यावर सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून ईशान्य भारतीयांना देशात मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन  दिली आहे. ती म्हणते की, “जर तुम्ही ईशान्य भारतीय असाल तर तुम्ही देशासाठी मेडल जिंकला तरच तुम्ही भारतीय असता. अन्यथा त्यांच्यासाठी तुम्ही चिंकी, चायनीज, नेपाळी किंवा कोरोना असता. भारत केवळ जातीयभेदाने नाही तर वर्णभेदानेही पोखरला आहे. हे मी मला आलेल्या अनुभवावरुन सांगते.”

हे ही वाचा:

मोदी सरकार कर्जबुडव्यांविरोधात उचलणार ‘हे’ कठोर पाऊल

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश

काय आहे भारत-रशिया दरम्यानचा इंद्र-२१ युद्ध सराव?

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. त्यानंतर तिच्या नावाचे गुणगाण सर्व देशभर सुरु आहे. अनेकांनी यावर आपल्याला तिचा अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. तिथेही मिराबाईबद्दल कुणीही अपमानास्पद असे काहीही म्हटलेले नाही.

Exit mobile version