मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळपासून मुंबईत धुँवाधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.

नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कोपरखैरणे येथील राम सोसायटीत काल रात्री झाड पडल्याने ४ ते ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. काल रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

पावसाने सलग तीन दिवसापासून ठाण्याला झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरल्याने ठाण्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

देशात ७० दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेची तयारी सुरु

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रात्रभरापासून पाऊस कोसळत असल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. नालासोपारा पूर्व, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, गोकुळ सोसायटी, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम, विवा कॉलेज रोड आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. गोकुळ सोसायटीत तर गुडघाभर पाणी साचले असून सोसायटीच्या इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत पाणी आलं आहे. वसई-नालासोपाऱ्यात आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिला तर हाहा:कार माजू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version