तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या संदेशखालीतील महिलांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सोमवारी भेट घेतली. त्यानंतर शर्मा यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
रेखा शर्मा या पीडितेचे सांत्वन करत असल्याचा व्हिडीओ ‘एक्स’वर जाहीर करत ‘अशा गरीब निराधार महिलांचे दुःख पाहून एका महिला मुख्यमंत्र्यांचे हृदय हेलावत कसे नाही?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी या प्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. संदेशखालीतील महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तृणमूल सरकार करत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला. ‘मी यापूर्वी अनेकदा म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी एक महिला म्हणून तिकडे जावे आणि काय घडते आहे, हे जाणून घ्यावे. जर त्या तिथे मुख्यमंत्री म्हणून गेलात आणि स्वतःचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न म्हणून तिथे गेलात, तर तुम्हाला तिथे काहीही दिसणार नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा:
चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे!
भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला उपग्रह
हल्दवानी हिंसाचारात वाँटेड असलेल्या दोघांसह १० जणांना अटक!
कठीण समय येता ज्योतिषी कामास येतो…
काही दिवसांपूर्वीच अनुसूचित जातीजमातींच्या राष्ट्रीय आयोगानेही राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. तसेच, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या प्रकरणी अहवाल सादर केला होता. संदेशखालीतील महिलांबाबत बोलताना तेथील परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे रेखा शर्मा यांनी सांगितले. तेथील एका महिलेने तिच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. ‘संदेशखालीतील महिलांचा अतिशय क्रूरपणे छळ करण्यात आला आहे. त्यांचा विनयभंग झाला आहे. दोघींनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.
मात्र त्या तक्रार करण्यास धजावत नाहीत. एक तर त्यांना समाजाची भीती आहे आणि दुसरी पोलिसांची,’ असे शर्मा म्हणाल्या. या पीडित महिलांनी त्यांच्या तरुण मुलींना काय अत्याचार सहन करावे लागतील, या विचाराने लांबच्या शहरात पाठवले आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. तसेच, राज्याच्या प्रशासकीय विभागांनी केंद्रीय संस्थांना सहकार्य करू नये, असे तृणमूल काँग्रेसने बजावल्याचा आरोपही त्यांनी केला. तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला तातडीने अटक करावी, जेणेकरून अधिकाधिक महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येतील, अशी मागणी त्यांनी केली.