27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष...मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

गृहमंत्र्यांनी राम मंदिराची तारीख जाहीर केल्यानंतर त्यांना पुजारी म्हणून हिणवले

Google News Follow

Related

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असताना रोज उठसुठ बोलत होते. मंदिर वही बनाऐंगे, तिथी नही बताऐंगे. पण त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी परवाच एका भाषणात सुनावले की, राहुल गांधी कान उघडून ऐका, तारीख नोट करून ठेवा. अयोध्येत १ जानेवारी २०२४ ला भव्यदिव्य राम मंदिर तयार झालेले असेल. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर कधी बांधून पूर्ण होणार,  हे पुजाऱ्यांनी सांगणे अपेक्षित आहे. असे असताना त्यांचे काम सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करत आहेत, अशी हेटाळणी केली.

काँग्रेसची सत्ता असताना राम मंदिराच्या उभारणीसाठी काँग्रेसने अनेक अडथळे निर्माण केले. काँग्रेसने वर्षानुवर्षे या विषयाचे भिजत घोंगडं ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. मंदिराचे भूमिपूजन झाले आणि तातडीने कामाला सुरूवात झाली. राम मंदिर हा हिंदूच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे.

हिंदूच्या भावना या मंदिराच्या प्रत्येक शिळेत आहेत. या अयोध्येच्या मातीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन करून मंदिराची पायाभरणी केली. शंखनाद झाला, देशात दिवाळी साजरी झाली. घराच्या बाहेर दिवे लागले गेले. वेळेआधीच दिवाळी साजरी झाली. भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण सातासमुद्रापार बघितले गेले. जय श्रीरामच्या आवाजांनी शहरं दुमदुमून गेली. अयोध्येत जेव्हा राम मंदिर तयार होईल, तेव्हा ते जागतिक तीर्थक्षेत्र बनेल.

राम मंदिर सोडाच, जे साधे देवळातही जात नाही अशी टीका होणारे शरद पवार राम मंदिराविषयी वाच्यता करताहेत. गृहमंत्र्यांनी मंदिर भाविकांसाठी कधी खुले जाईल याची तारीख जाहीर केल्यानंतर त्यांना पुजारी म्हणून हिणवताहेत. पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम अद्यापही कायम आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव ज्यांची वृत्ती आहे, अशांना निवडणूकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देवाची आठवण येते. आम्हीही देवळात जातो, देवाला मानतो हे सांगावे लागते. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून मी देवभक्त आहे नास्तिक नाही हे सिद्ध करावं लागतं. हे असं झालं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे. हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर पवारांनी भाष्य केले. हा मुद्दा महत्त्वाचा नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यानंतर टीका झाल्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागली होती.

शरद पवार यांनी अमित शहा यांना पुजारीची उपमा दिल्यानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलेय. पवार ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये सहभागी होते, तर शरद पवार १० वर्षे कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय. कृषिमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांना प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं होतं. परंतु त्यांनी रस दाखवला क्रिकेटमध्ये. पवार हे काही क्रिकेटर नव्हते. त्यांनी साधं गल्ली क्रिकेटही खेळलेलं नसेल.

पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. जगात श्रीमंत असलेली क्रिकेट संघटना बीसीसीआय़चेही ते अध्यक्ष बनले. एवढ्यावरच न थांबता अशी कोणती गुगली टाकली की पवार थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष बनले. पवार एक राजकीय नेते असताना त्यांनी क्रिकेटची अनेक पदं भूषवली. पवारांना क्रिकेटचे असे कोणते ज्ञान होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्यासाठी तो मुंबईतला असावा लागतो हा नियम आहे. हे अध्यक्षपद भूषवता यावं यासाठी शरद पवारांनी आपला पत्ताही बदलायला कमी केलेला नाही.

शरद पवारांचे सासरे सदू शिंदे हे क्रिकेटर एवढाच काय तो पवारांचा क्रिकेटशी संबंध. क्रिकेटव्यतिरिक्त ते कुस्ती, कबड्डी, खोखोचेही अध्यक्ष बनले. संधी मिळाली असती तर अगदी पकडा-पकडीचे अध्यक्षही ते बनले असते. पवारांना जर खेळाविषयी इतके प्रेम आणि आपुलकी होती तर त्यांनी कृषिमंत्रीऐवजी क्रीडामंत्री हे खाते घ्यायला हवे होते. पण त्यात त्यांनी कधी स्वारस्य दाखवले नाही. पण तेच पवार अमित शहा यांना मात्र हिणवतात की, ते गृहमंत्री आहेत की पूजारी. तेव्हा त्यांनी स्वतःकडे एकवार पाहायला हवं होतं.

शरद पवारांनंतर खो-खोचे अध्यक्षपद आता अजित पवारांना मिळाले आहे. आता रोहित पवारांच्या गळ्यात महाराष्ट्र क्रिकेट अध्यक्षांची माळ पडली आहे. महाराष्ट्र क्रिकेटच्या अध्यक्षपदी निवड होण्यामागे तीही बिनविरोध, नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. राजकारणातील घराणेशाही आता खेळातही दिसायला लागली आहे. शरद पवार, पुतण्या आणि आता नातू ही परंपरा जपताहेत.

निलेश राणे यांनी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जोरदार निशाणा साधला होता. आमदार रोहित पवार यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स आणल्या, हे महाशय काय आणतात बघूया असे ट्वीट केले आहे. पवार यांचे क्रिकेटमधील योगदान काय अशी खोचक टीकाही त्यांनी केलीय. पवार आणि कुटुंबिय यांचा क्रिकेटशी काय संबंध यातूनच ही टीका झाल्याची चर्चा आहे. अमित शहा यांच्यावर सवाल उपस्थित करताना आपला आणि आपल्या कुटुंबियांचा क्रिकेटशी काय संबंध असा सवालही त्यांनी स्वतःला विचारून पाहायला हरकत नाही.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या संग्रहालयाला शरद पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. इनडोअर क्रिकेट अकादमीला तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच त्यांचे नाव देण्यात आले. शरद पवारांनी अशी किती शतके ठोकली आहेत, किती बळी घेतले आहेत. कोणते रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे नाव या संग्रहालयाला कशाच्या आधारावर देण्याचे ठरले आहे. त्याजागी एखाद्या क्रिकेटरचे नाव देणे अपेक्षित होते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मुंबई क्रिकेट म्हटले की पवार असे जणू समीकरणच बनवून टाकले आहे. जर पवारांच्या हातात जर क्रिकेटचे नियम बदलण्याचे अधिकार असते तर, त्यांनी पॉवर प्लेला पवार प्ले हे नावही कदाचित दिले असते.

पवारांचा क्रिकेटशी काय संबंध हा सवाल कुणी विचारला नाही. पण काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा वर्ल्डकप विजेता ठरला. त्याचा कर्णधार रिकी प़ॉटिंगने पवारांना धक्का मारला होता. त्याची ती कृती चुकीचीच होती पण राजकारण्यांचा क्रिकेटशी काय संबंध असा तर सवाल त्याने उपस्थित केला नव्हता ना.

मग आज जेव्हा शरद पवार हे अमित शहा यांना सवाल विचारतात तेव्हा त्यांना तो विचारण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. मंदिराचा मुद्दा हा काही एखाद्या पुजाऱ्याचा मुद्दा नाही तर तो देशाचा मुद्दा आहे, हे पवारांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे त्याबद्दल प्रत्येक भारतीय बोलणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या तो स्वाभिमानाचा विषय आहे. क्रिकेटसोबत तोंडी लावायला राजकारण असे राममंदिराच्या बाबत नाही. असा विचार करण्याची पद्धत ही काँग्रेसची असू शकते. त्यातूनच लोकांनी त्यांना दूर केले. आपण संजय राऊत नाही, हे शरद पवारांनी लक्षात घ्यावे एवढेच सांगावेसे वाटते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा