‘भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधी यांना भेटायचे असेल तर १० किलो वजन कमी करावे लागेल, असे मला राहुल यांच्या टीमकडून सांगण्यात आले होते,’ असा आरोप मुंबई युथ काँग्रेसच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले झीशान सिद्दीकी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्याभोवतीची माणसे पक्षाला संपवू पाहात आहेत, असा दावाही त्यांनी केला.
मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी प्रसारमाध्यमांसमोर संताप व्यक्त केला.
‘राहुल गांधी हे चांगले नेते आहेत. ते चांगले काम करत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे मला पित्यासमान आहेत. मात्र काहीवेळा ज्येष्ठ असूनही खर्गे यांचे हात बांधले गेले आहेत. राहुल गांधी यांच्या आसपासची माणसे पक्षाला संपवू पाहात आहेत. जणू काही पक्षाला संपवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांकडून सुपारीच मिळाली आहे,’ असा आरोप झीशान यांनी केला.
‘जेव्हा मी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तेव्हा राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाने मला १० किलो वजन कमी करायला सांगितले. मी आमदार आहे, मुंबई युथ काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तुम्ही अशा प्रकारे माझ्या वजनाची चेष्टा करता?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांची टीम भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘राहुल गांधी हे चांगले काम करत आहेत. मात्र त्यांची टीम खूप उद्धट आहे, हे ते समजू शकत नाहीत,’ असा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!
संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!
चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनची ऐतिहासिक कामगिरी!
रामलल्लाच्या दरबारात महिन्याभरात ६२ लाख भाविकांची हजेरी
याच महिन्यात झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र झीशान तेव्हा काँग्रेसमध्ये राहिले होते. आता मात्र त्यांनी पक्षात जे काही चालू आहे, त्यानुसार त्यांनाही नवे पर्याय बघावे लागतील, असा संकेत दिला.
‘गेल्या आठवड्यापर्यंत मी काँग्रेसमध्येच राहीन, असे सांगत होतो. मात्र ज्याप्रकारे काँग्रेस वागत आहे आणि ज्याप्रमाणे गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत, हे स्पष्ट संकेत आहेत की काँग्रेसला अल्पसंख्याकांची गरज नाही. त्यांना आमची गरज नाही. त्यामुळे आम्हाला अन्य पर्याय बघावेच लागतील. हे अतिशय दुर्दैवी आहे,’ अशी टीका त्यांनी केली. त्यांना युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून का हटवण्यात आले, याबाबतही त्यांना काहीच कल्पना नसल्याचा दावा त्यांनी केला. ‘याबाबत वरिष्ठ नेत्यांनी ना संवाद साधला, ना साधा फोन केला,’ असे ते म्हणाले.