मोदी सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत मोठा खुलासा केला आहे. केंद्र सरकारने सोमवारी (९ डिसेंबर ) संसदेत वक्फ बोर्डाच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत माहिती सादर केली. सादर केलेल्या आकडेवारीनुसार, वक्फ बोर्डाने देशातील एकूण ९९४ मालमत्ता बळकावल्याचे समोर आले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) खासदार जॉन ब्रिटास यांच्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने असेही सांगितले की, देशात वक्फ कायद्यांतर्गत ८,७२,३५२ स्थावर आणि १६,७१३ जंगम वक्फ मालमत्ता नोंदणीकृत आहेत. यासाठी त्यांनी इंडियन वक्फ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम (WAMSI) पोर्टलवर उपलब्ध माहितीचा हवाला दिला.
वक्फ बोर्डाने देशातील एकूण ९९४ संपत्तीवर अवैध कब्जा केला आहे. त्यापैकी वक्फने एकट्या तामिळनाडूमधील सर्वाधिक ७३४ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. यासह आंध्र प्रदेशमधील १५२, पंजाबमध्ये ६३, उत्तराखंडमधील ११ तर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील १० मालमत्ता बळकावण्यात आल्याची माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
त्याच वेळी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने राज्यसभेत माहिती दिली की, केंद्र सरकारने २०१९ पासून वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन प्रदान केलेली नाही. परंतु, राज्यांनी वक्फ बोर्डाला किती जमीन दिली, याची माहिती केंद्राकडे उपलब्ध नाही.
हे ही वाचा :
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर ‘या’ बेस्ट बसेसचा मार्ग बदलला
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
लालूप्रसाद यादव म्हणतात, ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममतांना द्या
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले २१ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले