भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. मुंबई येथील वानखेडे मैदानावर ही कसोटी खेळली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेल्या नव्या कोविड प्रतिबंधक नियमावलीमुळे या सामन्याला वानखेडे मैदानाच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५% लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील क्रिकेट रसिकांची चांगलीच निराशा होणार आहे.
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून ३ डिसेंबरपासून मुंबई येथील वानखेडे मैदानात या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना रंगणार होता. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट रसिकांमध्ये पाहायला मिळत होती. पण अशातच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढल्यामुळे या सर्व गोष्टींवर पाणी फेरले गेले आहे.
हे ही वाचा:
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
नव्या व्हेरियंटचा, नवी नियमावली
महाराष्ट्र सरकारने नव्या कोविड व्हेरियंटचा धोका लक्षात घेता नवी कोविड प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. शनिवार, २७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे या नव्या कोविड संदर्भातील प्रतिबंधात्मक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमावलीनुसार नाट्यगृह, चित्रपटगृह अथवा इतर सभागृहांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. तर उघड्यावर होणाऱ्या कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या तुलनेत २५% प्रेक्षकांनाच परवानगी असणार आहे.
त्यामुळेच या नव्या नियमावलीच्या अनुषंगाने वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याला मैदानाच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के प्रेक्षक उपस्थित राहतील. तर ही नियमावली न पाळणाऱ्या सर्वांवरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.