भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन

भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन

भारतीय फुटबॉलचा आवाज म्हणून ज्यांची ओळख होती, असे प्रसिद्ध क्रीडा समालोचक नोवी कपाडिया यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कुणीही नाही. त्यांच्या बहिणीचे निधन झाल्यानंतर जवळचे असे कुणीही नातेवाईक त्यांना नाहीत.

एक समालोचक म्हणून तर त्यांनी स्वतःचा ठसा उमटविलाच पण फुटबॉलवर अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली. मज्जातंतूच्या विकारामुळे ते आजारी होते. त्यामुळे पाठीच्या कण्यातील आणि मेंदूतील मज्जातंतूचे कार्य गेल्या काही वर्षांत हळूहळू मंदावले होते. गेली दोन वर्षे तर ते व्हीलचेअरवरच होते. तर गेल्या महिन्याभरात त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

अनेक दशके फुटबॉलचे समालोचक म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच ऑलिम्पिकमध्येही त्यांनी आपल्या समालोचनाचे कौशल्य सिद्ध केले होते. त्यांनी नऊ फुटबॉल वर्ल्डकपमध्येही समालोचन केले होते. त्यांनी बेअरफूट टू बूट्स, दे मेनी लाइव्हज ऑफ इंडियन फुटबॉल ही पुस्तके लिहिलीच पण फुटबॉल फॅनॅटिक्स एसेन्शियल गाईड बुक २०१४ हे पुस्तकही लिहिले.

 

हे ही वाचा:

भारताने दिल्या १०० देशांना लशी!

काँग्रेसच्या माजी महापौर राष्ट्रवादीत

पवारसाहेब पावसात भिजले; पण पावसात भिजणाऱ्या कामगारांच्या अश्रुंचे काय?

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

 

फुटबॉलचे समालोचन, लेखन याव्यतिरिक्त ते एक प्रोफेसरही होते. मुंबईतील खालसा महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करत असत. दिल्ली विद्यापीठातही त्यांनी काम केले. २००३ ते २०१० या काळात दिल्ली विद्यापीठात शिस्तपालन अधिकारी (प्रॉक्टर) म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना क्रीडाचाहत्यांकडून व्यक्त केली गेली. अनेक फुटबॉलप्रेमींनी त्यांच्या आठवणीही जाग्या केल्या.

Exit mobile version