पुतिन यांनी मोदींना फोन करून युक्रेन युद्धाचे कारण सांगितले !

वॅगनर प्रकरणावर झाली चर्चा

पुतिन यांनी मोदींना फोन करून युक्रेन युद्धाचे कारण सांगितले !

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी पुतिन यांनी मोदी यांना सद्यपरिस्थितीची जाणीव करून दिली. युक्रेन आणि रशियादरम्यानच्या युद्धग्रस्त परिस्थितीचाही त्यांनी परामर्श घेतला. सध्याच्या परिस्थितीतून तोडगा काढण्यासाठी राजकीय आणि न्यायिक पाऊल उचलण्यास युक्रेन तयार नसल्याचे पुतिन यांनी सांगितले. मात्र मोदी यांनी यावर ‘संवाद’ आणि ‘मुत्सद्देगिरी’वर जोर देण्याचे आवाहन पुतिन यांना केले.

पुतिन आणि मोदी यांच्यामध्ये युक्रेन युद्धासह विविध वैश्विक मुद्द्यांवर चर्चा झाली. २४ जून रोजी वॅगनर या खासगी लष्कराच्या गटाने पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी उचललेले पाऊल याबाबत मोदी यांनी पुतिन यांच्या भूमिकेला समर्थन दिले. तसेच, दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. शांघाय सहकार्य संघटना आणि जी-२० आदी मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. भारत आणि रशियाचे संबंध वाढवण्यासाठी आणि आपापसांतील राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी मोदी आणि पुतिन यांनी वारंवार संपर्कात राहण्याची ग्वाही एकमेकांना दिली.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात

नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून १० तास चौकशी

ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र; करोना काळातील खर्चांचे तपशील मागविले

नुकतेच पुतिन यांनी मोदी यांच्या संकल्पनेतून अवतरलेल्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचे कौतुक केले होते. तसेच, या संकल्पनेची रशियातही रुजवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दृष्टीने घरगुती वस्तूंच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी रशियातील उद्योजकांना केले. ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा भारतीय अर्थव्यस्थेवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले होते. रशियातील घरगुती उत्पादन आणि ब्रँडना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या धोरणांची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

Exit mobile version