चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट डिऍक्टिव्हेट केले आहे. विवेक यांचा आगामी चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रदर्शित होऊ नये यासाठी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील कॉल्स आल्यानंतर त्यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट डिऍक्टिव्हेट केले आहे. १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन केल्यानंतर काश्मिरी पंडित निर्वासितांची दुर्दशा या चित्रपटामधून दाखवण्यात आली आहे.
चित्रपट निर्माते विवेक यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मायक्रोब्लॉगिंग साईटवर #TheKashmirFiles मोहीम सुरू केल्यापासून त्यांना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले हे स्पष्ट करणारे एक पत्र त्यांनी लिहिले आहे. काश्मिरी बंधू आणि भगिनींच्या वेदनांवर एक प्रामाणिक चित्रपट बनवल्याबद्दल पाकिस्तानी आणि चिनी बॉट्सद्वारे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सतत कसा त्रास दिला जात आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी लिहिले आहे की, “बरेच लोक विचार करत आहेत की, माझं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालं आहे का? मात्र, ते तसे नसून मी ते निष्क्रिय केले आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. मी #TheKashmirFiles ची मोहीम सुरू केल्यापासून, माझे फॉलोअर्स कमी झाले आणि माझे काही फॉलोअर्स माझे कोणतेही ट्विट पाहू शकत नाहीत. त्यानंतर माझे डीएम अश्लील आणि धमकीच्या संदेशांनी भरलेले होते. याचा अर्थ हा होत नाही की मी या धमक्या हाताळू शकत नाही, परंतु हे सर्व पाकिस्तानी आणि चिनी बॉट्स असण्याची शक्यता आहे. पण हे सर्व कशासाठी? आपल्या काश्मिरी बंधू- भगिनींच्या वेदनांवर एक प्रामाणिक चित्रपट बनवला आहे म्हणून? सोशल मीडियामुळे या अशा घटकांना बळ मिळते. समाजातील ज्या घटकांचा आवाज दाबला जातो अशांच्या वतीने मी बोलत असतो. पण त्यांना माझा आवाज दाबायचा आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले आहेत.
हे ही वाचा:
मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या भेटीला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
विवेक यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जम्मू- काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराबद्दल आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याचे लेखन केले असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार हे प्रमुख कलाकार आहेत.