२०१९ नंतर विराटचे कसोटीत शतक

शतक झळकावण्यासाठी कोहलीला तब्बल १२०६ दिवसांची वाट पाहावी लागली

२०१९ नंतर विराटचे कसोटीत शतक

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ च्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने शतक झळकावले आहे. विराटने हे शतक झळकावून टेस्ट क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यासाठी कोहलीला तब्बल १२०६ दिवसांची वाट पाहावी लागली. त्याने कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते. कोहलीने २४१ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक पूर्ण केले आणि या दरम्यान त्याने केवळ ५ चौकार ठोकले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७५ वे शतक आहे.

शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने अत्यंत शांत स्वभावाने आपले शतक साजरे केले. १०० धावा केल्यानंतर त्याने जुन्या शैलीत गळ्यातील अंगठी काढली आणि तिचे चुंबन घेऊन त्याने हे शतक पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले. २७ व्या शतकानंतर त्याने २८ वे शतक झळकावण्यासाठी एकूण ४१ डाव घेतले. याआधी त्याने ११ व्या आणि १२ व्या शतकादरम्यान ११ डाव घेतले होते. या शतकामुळे कोहलीने सुटकेचा निश्वास टाकला असावा.

चौथ्या कसोटीत विराट कोहली अतिशय संयमाने फलंदाजी करताना दिसला. सामन्याचा तिसरा दिवस संपेपर्यंत कोहलीने ५९ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात स्मिथने कोहलीविरुद्ध अनेक रणनीती आखल्या. पण कोहलीच्या संयमापुढे सर्व काही व्यर्थ गेल्या. कोहलीने पहिल्या सत्रात केवळ २९ धावा केल्या, ज्यासाठी त्याने ९२ चेंडूंचा सामना केला.

कोहलीचे क्रिकेटमधील चेंडूच्या बाबतीत हे त्याचे दुसरे सर्वात संथ शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने २४१ चेंडूत हे शतक झळकावले होते. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ शतक २०१२ मध्ये नागपुरात इंग्लंडविरुद्ध केले होते. जेव्हा किंग कोहलीने २८९ चेंडूंचा सामना केला होता.

कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात संथ शतक
२८९ विरुद्ध इंग्लंड      – नागपूर २०१२
२४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – अहमदाबाद २०२३*
२१४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पर्थ २०१८
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – एडिलेड २०१२
१९९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई २०१३

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोहलीचे हे १६ वे शतक असून एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक २० शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज
२० – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९ – डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड
१७ – सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
१६ – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
१६ – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली खूप पुढे गेला आहे. जो रूट ४५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आता त्याच्यापेक्षा ३० शतकांनी पुढे आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके
विराट कोहली – ७५*
जो रूट – ४५
डेव्हिड वॉर्नर – ४५
रोहित शर्मा – ४३
स्टीव्ह स्मिथ – ४२

Exit mobile version