भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना फारच खास असणार आहे. कारण भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली याचा हा शंभरावा कसोटी सामना असणार आहे. भारतासाठी शंभर कसोटी सामने खेळणारा विराट हा १२ वा खेळाडू ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराटला विजयी भेट देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल तर विराट कोहली देखील आपल्या चाहत्यांना शतकी मेजवानी देण्यासाठी प्रयत्नशील असेल
२०११ मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून विराट कोहलीने अनेक नवनवे विक्रम पादाक्रांत केले आहे. त्यात आता या नव्या विक्रमाची भर पडणार आहे. या शंभराव्या कसोटीत आपल्या शतकाचा दुष्काळ संपवण्याकडे कोहलीचे लक्ष असू शकते. जवळपास गेल्या २ वर्षांपासून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपले शतक साजरे केलेले नाही. त्यामुळे ते शतक आजच्या कसोटीत साजरे करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल.
हे ही वाचा:
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी
मोहालीमध्ये होणाऱ्या या समन्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. विराटच्या या शंभराव्या कसोटीच्या अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोविड प्रतिबंधक नियमावलीचा विचार करता ५० टक्के क्षमतेने ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून या सामन्याचा आस्वाद घेऊ शकतात.
भारतीय संघ हा सामना जिंकून विराट कोहलीला एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न करेल. तर त्या सोबतच या विजयासह मालिकेत आघाडी घेण्याकडेही भारतीय संघाचे लक्ष असेल.