भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी

भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

आयसीसी वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील आपली मोहीम भारताने यशस्वीरित्या सुरू केली. चेन्नईत झालेल्या या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने भारताला २०० धावांचे अल्प आव्हान दिले होते. पण भारताने चार विकेट्स गमावत हे आव्हान ४१.२ षटकांतच पूर्ण केले. केएल राहुल आणि विराट कोहली हे भारताच्या या यशाचे शिल्पकार ठरले. ऑस्ट्रेलियाला मात्र १९९२नंतर प्रथमच वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात हार मानावी लागली.

 

 

भारताला अवघे २०० धावांचे आव्हान पेलायचे होते पण त्यावेळी त्यांची चांगलीच दमछाक झाली. इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे तिघेही भोपळाही न फोडता माघारी परतल्यावर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्यामुळे भारत सुरक्षित स्थितीत आला. या जोडीकडूनच भारताला विजय मिळेल असे वाटत असताना मार्कस लाबुशेन याने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर विराटला झेलचीत केले. पण त्याआधी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकपमधील सर्वोच्च भागीदारी केली होती. दोघांनी १६५ धावा केल्या. विराट बाद झाला तेव्हा त्याच्याखात्यात ८५ धावा होत्या. त्याने ११६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ही अर्धशतकी खेळी केली.

 

 

विराट बाद झाल्यावर उपकर्णधार हार्दिक पंड्या मैदानात आला. त्याने मोठा फटका खेळत सामना संपविण्यासाठी पाऊल टाकले पण राहुलने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. राहुलचे शतक मात्र पूर्ण झाले नाही. त्यासाठी त्याला ३ धावा कमी पडल्या. त्याच्या या ९७ धावांच्या खेळीत २ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाक़डून सर्वाधिक विकेट्स जोश हेझलवूडने घेतल्या. त्याने भारताचे तीन फलंदाज माघारी धाडले.

 

हे ही वाचा:

तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!

सोमवारी सुनावणी, अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करा!

हमासने गंभीर चूक केली आहे, हे त्यांच्या लक्षात येईल!

वायुसेनेचा विजय असो!

 

त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा डाव मात्र अवघ्या १९९ धावसंख्य़ेवर आटोपला. स्टीव्ह स्मिथच्या ४६ तर डेव्हिड वॉर्नरच्या ४१ धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. रवींद्र जाडेजाने ३ बळी घेतले तर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना टिपले.

 

 

भारताने हा विजय मिळवत चेन्नईतील ३६ वर्षांपूर्वीच्या पराभवाचे उट्टे फेडले. १९८७मध्ये वर्ल्डकप सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १ धावेने पराभूत केले होते. त्याची परतफेड आता भारताने केली आहे.

 

Exit mobile version