वानखेडे स्टेडियमवर भारत न्यूझीलंड सामन्याच्या निकालाआधी एका घटनेने संपूर्ण भारतातील क्रिकेट चाहत्यांना जल्लोष करण्यास उद्युक्त केले. बुधवारच्या दिवशी वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या या झुंजीत तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली मैदानावर अवतरल्यानंतर सर्वांचे लक्ष भारताच्या धावांपेक्षा विराटच्या धावसंख्येकडे होते. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर ती प्रकाशमान घटना सायंकाळी घडली. विराट कोहलीने झळकावलेले ५० वे वनडे शतक हाच तो मास्टरस्ट्रोक. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९व्या शतकाची बरोबरी करणाऱ्या विराटने सचिनच्या घरच्या मैदानावर ५०वे शतक ठोकून त्याला खणखणीत अशी सलामी दिली. विराटसह मुंबईकर श्रेयस अय्यरनेही शतकी खेळी केली. त्यामुळे भारताने ४ बाद ३९७ धावा करत न्यूझीलंडपुढे कडवे आव्हान ठेवले.
१०६ चेंडूंत विराटने आपली ही विश्वविक्रम शतकी खेळी साकारली. विराटने केलेल्या या शतकानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरने उभे राहून विराटच्या या कामगिरीचे टाळ्या वाजवत कौतुक केले. विराटची पत्नी अनुष्का शर्माही यावेळी फ्लाइंग किस देत आपली पतीराजाच्या विक्रमी कामगिरीवर जल्लोष करत होती.
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
सचिनने विराटच्या या विक्रमी खेळीनंतर भावनिक अशी पोस्टही एक्सवर शेअर केली.
सचिनने काढली विराटची ती आठवण
सचिनने त्यात म्हटले की, मी तुला पहिल्यांदा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भेटलो तेव्हा तू माझ्या पायाला स्पर्श करताना संघसहकाऱ्यांनी तुझी थट्टा उडविली होती. त्या दिवशी मी खूप हसलो होतो. पण लवकरच तू माझ्या हृदयाला स्पर्श केलास ते तुझ्या जबरदस्त कामगिरीच्या आणि कौशल्याच्या जोरावर. मी आज खूप आनंदी आहे की, एक तरुण मुलगा आज ‘विराट’ खेळाडू बनला आहे. एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता? आणि तेही वर्ल्डकप उपांत्य फेरीसारख्या सामन्यात शिवाय माझ्या घरच्या मैदानावर म्हणजे सोन्याहून पिवळे!
हे ही वाचा:
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
जम्मू- काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात; ३० ठार
भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्याला अटक!
माझ्या कारकीर्दीला आधार देणारा दिलदार माणूस!
विराटने आता सचिनचा वनडे क्रिकेटमधला विक्रम मोडला असला तरी त्याला अद्याप त्याच्या शतकांच्या शतकांच्या विक्रम मोडण्यासाठी आणखी २० शतकांची गरज आहे. कसोटीत त्याची २९ शतके आहेत तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने एक शतक ठोकले आहे.
विराटने या वर्ल्डकपमध्ये तीन शतके झळकाविली आहेत. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची ही शतकी खेळी साकारली आहे. इडन गार्डनवर त्याने आपले ४९वे वनडे शतक ठोकले होते आणि त्यावेळी सचिनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली होती.
सचिन तेंडुलकरने एका वर्ल्डकपमध्ये केलेल्या धावांचा विक्रमही विराटने मागे टाकला. सचिनच्या खात्यात ६७३ धावा होत्या. विराटने ७०० धावांचा टप्पा ओलांडला.