भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात २९वे कसोटी शतक ठोकून ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली आहे. हे त्याचे ७६वे आंतरराष्ट्रीय शतक.
विराट कोहलीने तब्बल पाच वर्षांनंतर परदेशात शतक ठोकले. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही कामगिरी केली. त्याने परदेशी मैदानातील शेवटचे शतक डिसेंबर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे ठोकले होते. तेथे त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध दुसऱ्या डावात १२३ धावा केल्या होत्या. आता सर्वाधिक कसोटी शतके करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर आहेत.
वेस्ट इंडिजमधले हे कोहलीचे दुसरे तर, त्यांच्याविरुद्धचे तिसरे कसोटी शतक आहे. याबाबतही त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजमध्ये सर्वाधिक शतके सुनील गावस्कर (७), राहुल द्रविड, दिलिप सरदेसाई आणि पॉली उमिग्रर (प्रत्येकी तीन) यांनी ठोकली आहेत.
३४ वर्षीय विराट कोहलीने आपल्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी केली. आतापर्यंत भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ही कामगिरी केली आहे.
हे ही वाचा:
महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी
इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू
देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार
पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?
कोहलीने मैदानावर प्रवेश केल्यानंतर अवघ्या तीन षटकांतच कर्णधार रोहित शर्मा तंबूत परतला. त्यानंतर शुभमन गिल (१०) आणि अजिंक्य राहाणे (८) हेदेखील झटपट बाद झाले. त्यामुळे कोहलीला काळजीपूर्वक खेळ खेळावा लागला. त्याने रवींद्र जाडेजासोबत खेळपट्टीवर जम बसवून धावफलक हलता ठेवला. त्याचे अर्धशतक ६६व्या षटकांत झाले. त्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा, तो ८७ धावांवर नाबाद होता. त्याने खेळाच्या दुसऱ्या दिवशी केमार रोचच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पहिला चौकार मारला. तर, शॅनॉन गॅब्रिएलच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह मारून त्याने त्याचे शतक पूर्ण केले.