मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ वनडे क्रिकेट शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची विराट कोहलीची संधी पाच धावांनी हुकली असली तरी भारताने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप विजय प्राप्त करत गड मात्र राखला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने ५ बळी घेत किवींना २७३ धावांवर रोखले.
वर्ल्डकपमधील या महत्त्वाच्या सामन्यात गुणतक्त्यातील पहिल्या दोन क्रमांकाचे संघ आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने केलेल्या २७३ धावांना उत्तर देताना विराट कोहलीने ९५ धावांची खेळी केली पण सामना जिंकायला आलेला असताना त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण मिडविकेटला त्याने झेल दिला आणि त्याचे शतकपूर्तीचे तसेच सचिन तेंडुलकरच्या ४९व्या शतकाशी बरोबरी करण्याचे स्वप्न मात्र भंगले.
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील आणखी एका रोमहर्षक सामन्यात भारताने गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी विजय मिळवित तक्त्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारताच्या या विजयात विराटच्या ९५ धावा जशा महत्त्वाच्या होत्या तसाच मोहम्मद शमीने घेतलेल्या पाच बळींचाही मोठा वाटा होता. त्यालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हे ही वाचा:
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशिदीवर बॉम्बहल्ला
पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मदतीसाठी भारताचे विमान रवाना!
न्यूझीलंडने आपले सलामीचे फलंदाज लवकर गमावल्यानंतर डॅरिल मिचेल आणि राचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली पण त्यांच्या इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने न्यूझीलंडला २७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मोहम्मद सिराजने किवींच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले तर शमीने नंतर आपली कामगिरी चोख बजावली. जमलेली राचिन रवींद्र आणि मिचेल यांची जोडी शमीने फोडलीच नाही तर दोघांनाही बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची पुढे घसरगुंडी सुरू झाली.
न्यूझीलंडच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. रोहित शर्मा (४६) आणि शुभमन गिल (२६) यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी गेल्यावर मात्र विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ५२ धावांची भागीदारी केली. नंतर केएल राहुलने विराटला साथ दिली. रवींद्र जाडेजाने मग ३९ धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला.
पाच आकड्याची कमाल
भारताने या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. हा सलग पाचवा विजय होता. त्यामुळे भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे. मोहम्मद शमीनेही ५ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीचे शतकही पाच धावांनीच हुकले.