गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर असताना मुंबई ते कोकण रेल्वे प्रवासासाठी अद्यापही कोणतेही नियम जाहीर करण्यात आलेले नाहीत. समाज माध्यमांवर मात्र कोकणातील प्रवासासाठी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल गरजेचा असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता प्रवासी राज्य सरकारकडून स्पष्ट सूचनांची वाट पाहत आहेत.
कर्नाटकातून महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल असणे बंधनकारक आहे. त्यामुळेच मुंबई ते कोकण प्रवासासाठीही आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल गरजेचा आहे, अशा आशयाचा मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे गणपतीसाठी मुंबईतून कोकणात जाणारे चाकरमानी संभ्रमात पडले आहेत.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून ऊस शेतकऱ्यांना मोठी भेट
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’
भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी
मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्यामुळे रेल्वे आणि एसटी सेवा पूर्णतः बंद होत्या त्यामुळे चाकरमान्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही. अनेकांनी गणपतीसाठी गावी जायचे म्हणून लसीचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. रेल्वेनेही कोकणसाठी २०० हून अधिक अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. एसटी महामंडळानेही दोन हजारांहून अधिक गाड्या सोडल्या आहेत आणि चाकरमान्यांनी या गाड्यांचे आरक्षणही केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या स्पष्ट नियमावलीची प्रतीक्षा चाकरमानी करत आहेत.
उत्सव काळात कोकण मार्गावरील बहुतांशी प्रवासी हे मध्य रेल्वेने प्रवास करतात. सध्या गणपती विशेष प्रवासासाठी कोणतेही नियम नसून सध्या सुरू असलेल्या नियमांप्रमाणेच रेल्वे प्रवास करता येईल. राज्य सरकारने नवे नियम लागू केल्यास त्याची माहिती घेऊन अधिक बोलणे योग्य ठरेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.