‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!

राजनाथ सिंह यांचे मैतेई, कुकी समुदायाला आवाहन

‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!

‘हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नावर तोडगा असू शकत नाही. एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधा आणि एकमेकांमधील अविश्वासाची भावना कमी करा,’ असे आवाहन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायाला केले.मिझोरममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या निमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ‘हा हिंसाचार कोणत्याही राजकीय पक्षाने घडवला नव्हता आणि हे घडण्यासाठी काही परिस्थिती कारणीभूत होती,’ असे सिंह यावेळी म्हणाले.

‘गेली नऊ वर्षे ईशान्येकडील राज्ये शांत होती. प्रत्येक राज्यातील घुसखोरी थांबली होती. मात्र या वर्षी मणिपूरमध्ये आपल्याला दुर्दैवी हिंसाचार पाहायला मिळाला, त्यामुळे आपल्याला अतोनात दुःख झाले,’ असे सिंह म्हणाले.
‘हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नावर तोडगा असू शकत नाही. आपल्याला एकमेकांशी मनापासून संवाद साधावा लागेल. मी दोन्ही समाजाला आवाहन करतो की, तुम्ही एक्तर बसा आणि एकमेकांमधील अढी दूर करा,’ असे सिंह म्हणाले.
अनेक विरोधी पक्षांनी भाजप हा पक्ष मैतेई समाजाला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता. मात्र पक्षाने तो खोडून काढला आहे. राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर मणिपूरच्या परिस्थितीचा काँग्रेसकडून राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप केला.

हे ही वाचा:

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार

ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास

‘जेव्हा मणिपूरची परिस्थिती बिघडत चालली होती, तेव्हा काँग्रेसने त्यावरून शक्य तितके राजकारण केले. त्या अवघड परिस्थितीत मणिपूरला जाऊ नका, असे आवाहन आम्ही त्यांच्या राजकीय पक्षांना केले होते. मात्र ते तेथे गेले आणि त्यांनी लोकांच्या जखमांवर मीठ चोळले,’ असा आरोप सिंह यांनी केला. ‘मिझोरम आणि ईशान्य भारतासह संपूर्ण देश काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे,’ असे त्यांनी नमूद केले. ‘ईशान्य भारत संपूर्णपणे विकसित न झाल्यास एक सशक्त, संपन्न आणि स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, यावर मोदी सरकारचा विश्वास आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजप सत्तेत आल्यास अमली पदार्थमुक्त मिझोरम करण्यासाठी मोहीम राबवली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

Exit mobile version