मणिपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक झाला असून थौबल आणि इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी थौबल जिल्ह्यात अज्ञात सशस्त्र समाजकंटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष झाला. लिलोंगमध्ये झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले नाहीत, असे मणिपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सशस्त्र हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या गोळीबारात किमान तीन जण जबर जखमी झाले आहेत. इम्फाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी उठवण्यात आली होती. मात्र या घटनेमुळे पुन्हा येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यामध्येही पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अरुण योगीराज यांनी साकारलेल्या राममूर्तीची होणार प्रतिष्ठापना!
अर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
कृष्णविवरांचा तपास करणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश
‘अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’
मुख्यमंत्र्यांचे शांतता राखण्याचे आवाहन
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शांतता राखण्याचे आणि कायदा आपल्या हातात न घेण्याचे आवाहन केले. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘मी लिलोंगच्या नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी आता आणखी हिंसाचार करू नये. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी परिसरात आणखी पोलिस तैनात केले जातील’, असे आश्वासन देत समाजकंटकांना शरणागती पत्करण्याचे अथवा परिणामांना तयार राहण्याचे आवाहन केले.
मणिपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त
मणिपूर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी तपासणी नाक्यांवर सुरक्षा वाढवली आहे. थौबल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सीमेलगतच्या आणि संवेदनशील परिसरात सुरक्षा दलाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. मणिपूरच्या डोंगराळ आणि खोऱ्याच्या भागांतील जिल्ह्यांत एकूण १४० तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पोलिसांनी राज्यातील ठिकठिकाणांहून हिंसाचाराशी संबंधित २३८ जणांना ताब्यात घेतले आहे.