भारताचा एकेकाळचा स्टार फलंदाज विनोद कांबळी हा सध्या प्रकृतीच्या कारणास्तव झगडत आहे. मध्यंतरी सचिन तेंडुलकरच्या एका कार्यक्रमात तोदेखील सहभागी झालेला असताना त्याची अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सध्या तो उपचार घेत आहे आणि अनेक लोक त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
त्याच्या या अवस्थेबद्दल प्रसिद्ध मॉडेल आणि त्याची पत्नी अँड्रियाने मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. दैनिक भास्करच्या संडे जज्बातमध्ये तिने आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटले आहे की, आईच्या निधनामुळे तेव्हा विनोद हा खूप अस्वस्थ आणि तणावाखाली होता. त्यावेळी त्याला दारूचे व्यसन लागले होते. कदाचित या ताणामुळे तो दारू पित असावा असे मला वाटले पण नंतर ती त्याची सवयच बनून गेली. लग्नाबद्दल मला त्याने विचारले तेव्हा प्रथम तुला दारू सोडावी लागेल असं मी त्याला स्पष्टच सांगितलं होतं.
हे ही वाचा:
सर्व वाद बाजुला ठेवा आणि ‘इमर्जन्सी’ पाहा!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त!
गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !
पवारांचा टाहो ! लोकप्रतिनिधींना वाचवा हो…
१४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१०ला जेव्हा आमच्या पहिल्या मुलाचा जन्म होणार होता, तेव्हा आर्थिक समस्यांमुळे कांबळी खूप संकटात सापडला होता. त्यावेळी अँड्रियाने कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि अनेक नवी कॉन्ट्रॅक्ट स्वीकारली. तेव्हा कांबळीची प्रकृती सुधारू लागली. तब्बल ६ वर्षे विनोद दारू पित नव्हता. मात्र तो सिगारेट ओढत असे. त्याच्या प्रकृतीत ही सुधारणा पाहून सचिनलाही आश्चर्य वाटले होते. मात्र तो पुन्हा दारू पिऊ लागला. २०१४मध्ये मुलीच्या जन्मानंतर कांबळीची दारूच्या व्यसनामुळे अधिकच वाईट अवस्था झाली होती. या व्यसनामुळे त्याला पुनर्वसन केंद्रात पाठविण्याची वेळ आली.अँड्रिया म्हणाली की, आत्तापर्यंत तो ६-७ वेळा अशा पुनर्वसन केंद्रात गेलेला आहे. कोविडच्या काळात तर त्याचे कामच बंद पडले. त्यामुळे आम्ही आणखी संकटात सापडलो. २०२३ला त्याने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली पण त्याचे दारू पिणे काही थांबले नाही.
अँड्रियाने कांबळीची करुण कहाणी सांगताना म्हटले आहे की, आम्ही जिथे राहतो, तिथे आणखी काही माजी खेळाडू राहतात. पण सोसायटीत आम्हाला त्रास दिला जातो. नोटिसा लावून छळलं जातं. विनोदला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. विनोदला त्याचे भाऊ आवडत नाहीत. माझ्या कुटुंबाचाही दबाव आहे, पण मी माझ्या पतीची साथ कधीच सोडू शकत नाही. सचिनने पूर्वी आमच्या मुलांच्या शाळेसाठी फीचे पैसेही पाठवले, नंतर मी ते परतही केले. मात्र एका शोदरम्यान विनोदने सचिनबद्दल जे उद्गार काढले, त्यामुळे त्यांच्यातील संबंध विनाकारण बिघडत गेले.